राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी रंगपंचमीच्या शुभेच्छा देतानाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय. पती देवेंद्र फडणवीस आणि मुलगी दिविजासोबतचा रंगपंचमीचे फोटो शेअर करताना अमृता यांनी कॅप्शनमधील एका शब्दाला कोट करत अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमृता यांनी शेअर केलेल्या फोटोत देवेंद्र आणि अमृता यांच्यामध्ये दिविजा उभी असल्याचं दिसतंय. तिघांच्याही चेहऱ्यावर रंग लावण्यात आल्याचं फोटोत दिसतंय. हे फोटो शेअर करताना अमृता यांनी, “सर्व चांगल्या आणि ‘नॉटी’ लोकांना होळीच्या फार शुभेच्छा” असं म्हटलंय. या कॅप्शनमधील ‘नॉटी’ हा शब्द त्यांनी अवतरण चिन्हं वापरल्याने यामधून त्यांनी राऊत यांनी २०२० मध्ये केलेल्या वक्तव्यावरुन निशाणा साधल्याचं बोललं जातंय.

हे ‘नॉटी’ शब्दावालं प्रकरण आहे तरी काय?
२०२० मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध शिवसेना असा शाब्दिक संघर्ष शिगेला पोहचला होता. कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सोशल मीडियावर नवा वाद सुरू झाला होता. यावेळी संजय राऊत यांनी कंगनाच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवला. त्यानंतर संजय राऊत आणि कंगना यांच्यात सोशल मीडियावर खडाजंगी पाहायला मिळाली होती. या संपूर्ण वादादरम्यान एका मुलाखतीत संजय राऊतांनी कंगनाचा उल्लेख हरामखोर मुलगी असा केला. त्यांच्या या टिप्पणीवर अनेक कलाकारांनी आक्षेप घेत राऊतांनी कंगनाची माफी मागावी अशी मागणी केली. हा वाद संपतच नाही तोवर संजय राऊतांनी कंगनाला ‘नॉटी गर्ल’ असं म्हटलं होतं.

अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी हरामखोर शब्दावरुन वाद झाल्यानंतर केलं होतं. एवढंच नाही तर हरामखोर या शब्दाचा अर्थही त्यांनी उलगडून सांगितला होता. हरामखोर म्हणजे मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजे खट्याळ मुलगी आहे आणि बेईमान आहे. असं मला वाटतं, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं होतं.

नुकताच अमृता यांनी नॉटीवरुन पुन्हा साधलेला निशाणा
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय विषयांवर सातत्याने थेट किंवा अप्रत्यक्षपणे भाष्य करणाऱ्या अमृता यांनी यापूर्वी अनेकदा नॉटी शब्दावरुन टोला लागवल्याचं पहायला मिळालंय. याच वर्षी २९ जानेवारी रोजी केलेल्या एका ट्विटमध्ये त्यांनी संजय राऊतांचा ‘नॉटी नामर्द’ असा उल्लेख केला होता. “थोडक्यात उत्तर द्यावे …५० मार्क्स ; नॉटी नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले ….या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स !शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब है और सुनने में आया है _नामर्द है !”, असं ट्विट करत अमृता यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलेला.

आपल्या या वक्तव्यावर अमृता फडणवीस यांनी काही दिवसांनी स्पष्टीकरणही दिलं होतं.  “त्यांना लोकांनीच ही उपाधी दिली आहे. मध्यंतरी त्यांनी एक चुकीची पोस्ट टाकली तेव्हा एका महिला नेत्यानेही त्यांचा तसाच उल्लेख केला. तेच मी उचलून तिथे टाकलं होतं. पण नामर्द शब्दाचा तंतोतंत अर्थ घेऊ नये. याचा अर्थ म्हणजे तुम्ही समोरुन न वार करता मागून करता असा होतो,” असं अमृता म्हणालेल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis wishes happy holi takes indirect dig at sanjay raut by quoting naughty scsg
First published on: 18-03-2022 at 16:08 IST