सातारा : हाडाचा शिक्षक कधीच निवृत्त होत नाही. शिक्षणाशी असलेली त्याची नाळही तुटत नाही. याचीच प्रचिती देताना एका प्राथमिक शिक्षिकेने वयाच्या चक्क ८० व्या वर्षी विद्यार्थ्यांचा तास घेतला. इतकेच काय, यावेळी इंटरॅक्टिव्ह बोर्डचाही सहजतेने वापर केला.

ताराबाई हिंदुराव निकम- पाटील या शिक्षिका. अपशिंगे (मिलिटरी, ता. सातारा) हे त्यांचे गाव. येथील प्राथमिक शाळेने राज्याच्या शैक्षणिक पटलावर ठसा उमटविला आहे. निकम या आपल्या सेवाकाळात या शाळेत दीर्घकाळ कार्यरत होत्या. १९६४ मध्ये त्यांच्या सेवेचा प्रारंभ झाला. २००४ मध्ये त्या निवृत्त झाल्या. नुकतीच त्यांनी अपशिंगे शाळेस भेट दिली. अपशिंगे मिलिटरी साताऱ्यातील सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील मोठ्या संख्येने युवक हे सैन्य दलात काम करतात. या गावाला सैन्यामध्ये काम करण्याची मोठी परंपरा आहे. ताराबाईंनी शिकवलेले अनेक विद्यार्थी देशाच्या सीमेवर विविध भागांत कार्यरत आहेत. त्याचाही त्यांना अभिमान आहे.

या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी कानमंत्र दिले. शाळेविषयीची आत्मीयता व्यक्त केली. शिक्षणाचे मोल, मूल्यांचे महत्त्व, आई-वडिलांची महती सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. सतत नवे काही शिकण्याची वृत्ती माणसाला पुढे घेऊन जाते, असे त्यांनी सांगितले. एके काळी खडू- फळा वापरणाऱ्या अन् मास्तरीणबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताराबाई निकम यांनी इंटरॅक्टिव्ह बोर्डचाही वापर केला. विद्यार्थ्यांनी उत्साहाने त्यांना कित्येक प्रश्न विचारले. या साऱ्यांची उत्तरेही त्यांनी सहजसोप्या भाषेत दिली. आपल्या अनुभवकथनातून जुन्या जमान्यातील शिक्षणपद्धती उलगडली. आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्वही स्पष्ट केले. व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर मोरे, मुख्याध्यापिका मंगल जगताप, तसेच सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

ही शाळा माझ्यासाठी माझ्या घराचाच एक भाग आहे. इथली मुले, परिसर, सहकारी शिक्षक आजही माझ्या मनात कायमच घर करून राहिले आहेत. – ताराबाई निकम – पाटील