सांगली : तासगावच्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार झालेल्या पार्थिवाचे काही भाग काढून नेण्याचा प्रयत्न घडला असून पोलीस आल्यानंतर मांत्रिकांनी पळ काढला असून एकाला ताब्यात घेण्यात आले. मात्र, हा प्रकार अघोरी विद्यैसाठी घडला का याची माहिती ताब्यात घेतलेल्याकडून मिळाली नाही.
तासगाव येथील एका सामाजिक कार्यकर्त्याच्या आईचे सोमवारी आकस्मिक निधन झाले. तासगाव येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अग्निसंस्कार झाला.
पार्थिवाला अग्नि दिल्यानंतर बहुसंख्य लोक घरी परतले. मात्र, मृताच्या भावकीतील काही जण पार्थिवाचे पूर्ण दहन होईपर्यंत स्मशानात थांबले होते.
यावेळी चार ते पाचजण स्मशान भूमीत आले. त्यांनी पेटत्या चितेमधून त्या पार्थिवाचे काही अवयव शोधण्यास सुरुवात केली. यावेळी सदर महिलेच्या कुटुंबीयांनी तुम्ही कोण आहात व काय शोधत आहात याबद्दल विचारणा केली. यावेळी त्यांचा व मृताच्या कुटुंबियातील लोकांमध्ये बाचाबाचीही झाली. अनाहूत आलेल्या एका तथाकथित मांत्रिकाने चाकू काढून धमकावले. या दरम्यान, त्यांनी पोलीसांशी संपर्क साधला.




घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी स्मशानभूमीकडे धाव घेतली. पोलीसांची चाहूल लागताच आलेल्या अज्ञात लोकांनी पळ काढला. मात्र, एक जण पोलीसांच्या हाती लागला. यावेळी त्यांने आपण अंत्यदर्शनासाठी आलो असल्याचे सांगून यातून नामानिराळा असल्याचे दर्शवले. रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडे या प्रकाराची चौकशी संशयित मांत्रिकाबाबत चौकशी करण्यात आली. मात्र, समाधानकारक माहिती मिळू शकली नाही. यामुळे भावना दुखावल्याचा जामीनपात्र गुन्हा दाखल करून त्याला सोडून देण्यात आले.