सांगली: स्मशानभूमीत काळ्या कापडात नारळ,लिंबू,काळ्या बाहुल्या त्यावर मुलींचे फोटो व त्यावर धारदार दाभण खुपसून करणीचा अघोरी प्रकार करण्याचा चिकुर्डे (ता.वाळवा) येथे बुधवारी उघडकीस आला. होळी पौर्णिमेपासून रस्त्याच्या लगत असणाऱ्या स्मशानभूमीत हा प्रकार सुरू होता. आज बुधवारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत धाव घेत हा प्रकार उघडकीस आणला.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव संजय बनसोडे,  कार्यकर्ते निवृत्त उपप्राचार्य बी. आर. जाधव, निवृत्त प्राचार्य डॉ. सुदाम माने,विनोद मोहिते यांनी हा नेमका काय प्रकार आहे हे उघडकीस आणल्यावर उपस्थित नागरिकांचे प्रबोधन करून स्मशानभूमीची स्वच्छता केली.

कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत म्हणाले, या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन मुळापर्यत तपास करू. कोणत्याही मुलींची ओळख जाहीर न करता गोपनीय तपास करून दोषींवर गुन्हे दाखल करू.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस पाटलांच्या समक्ष काळ्या कापडातील लटकत्या बाहुल्या व इतर साहित्य काढले.आत पाहिल्यावर धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कापड सोडल्यावर त्यातून नारळ, त्यावर काळी बाहुली,लिंबु व मुलींचे रंगीत फोटोला टोकदार दाभनातून नारळात खुपसले होते. तर नारळाला लाल रंगाचा दोरा गुंडाळून त्यात कागदी चिठ्या खुपसल्या होत्या. त्या उघडून पाहिल्यावर कागदावर मुलीचे नाव लिहले आहे. अशी पाच गाठोडी आहेत. यात पाच वेगवेगळ्या मुलींचे फोटो व नावे आहेत. एका कागदावर एका मुलाचे नाव आहे. हे सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.या प्रकरणी दोषींचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी अंनिसचे प्रधान सचिव संजय बनसोडे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An attempt was made to perform black magic in the graveyard by tying photos of girls in sangli amy
First published on: 27-03-2024 at 20:57 IST