मोहनीराज लहाडे

नगर : ‘अनामप्रेम’ या संस्थेने आजवर एक हजारांहून अधिक अपंगांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास साहाय्य केले आहे. समाजातील सर्वांत दुर्लक्षित घटक असलेल्या अपंगांच्या शिक्षणास प्रोत्साहन देण्याबरोबरच कौशल्य प्रशिक्षणाद्वारे त्यांना रोजगारक्षम बनवण्याचे आणि त्यांच्या पुनर्वसनाचे काम ही संस्था करीत आहे. शिक्षणाशिवाय वंचितांचे संपूर्ण पुनर्वसन अशक्य आहे, हे जाणून अपंगांच्या शिक्षणासाठी नगर शहरात, शहराजवळील निंबळक येथे आणि पुणे अशा तीन ठिकाणी संस्थेने वसतिगृहे सुरू केली आहेत. तेथे १८० अपंग शिक्षण घेत आहेत.

अपंगांच्या २१ प्रकारांपैकी अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग आदींच्या पुनर्वसनावर ‘अनामप्रेम’ने लक्ष केंद्रित केले आहे. अपंगांच्या शिक्षणासाठी वसतिगृहे, त्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी संगणक आणि किमान कौशल्याधारित व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सरकारी नोकरीतील चार टक्के आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, विशेषतः अंध तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा संच असलेले ब्रेल लिपीतील ‘प्रकाशवाटा’ मासिक, रोजगारासाठी चप्पल निर्मितीचा ‘साथी उद्योग’, विक्रीसाठी ग्रामीण भागात २० हून अधिक विक्री केंद्रांची साखळी, उद्योग उभारणीसाठी अर्थसाहाय्य अशा विविध मार्गांनी संस्था अपंगांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहे.

दिवंगत समाजसेवक डॉ. बाबा आमटे आणि ‘स्नेहालय’चे मार्गदर्शक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्नेहालय परिवारातीलच काही युवकांनी अपंगांच्या पुनर्वसनासाठी २००६ च्या सुमारास ‘अनामप्रेम’चे काम सुरू केले. छोट्या-छोट्या देणगीदारांच्या आधारावर संस्थेचे काम सुरू आहे. ‘यूथ फॉर जॉब’च्या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना हॉटेल, हॉस्पिटल, कारखाने, विविध संस्थांमध्ये रोजगार मिळवून दिला जातो. असा सुमारे ८०० हून अधिक अपंगांना रोजगार मिळाला आहे. तर स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून १५० हून अधिक अपंग युवक राज्य आणि केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये दाखल झाले आहेत. यासाठी निंबळक येथे दोन महिन्यांचे प्रशिक्षण केंद्र चालवले जाते, अशी माहिती संस्थेचे सहसंस्थापक अजित कुलकर्णी यांनी दिली.

साथी चप्पल उद्योगाच्या विक्री केंद्रांमधून २० जणांना रोजगार मिळाला आहे. संस्थेत ६० कर्मचारी आहेत. ते सर्व अपंग आहेत. त्यातील किमान ४५ जण संस्थेचेच विद्यार्थी आहेत. विक्रीकौशल्य प्राप्त व्हावे यासाठी संस्थेने स्वतःची चार विक्री केंद्रे चालवली आहेत. तेथे अपंगांना विक्री प्रशिक्षण दिले जाते. त्यांची अडचण ओळखून स्थिर विक्री केंद्रांऐवजी बॅटरीवर चालणाऱ्या १० गाड्यांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न संस्थेने सुरू केले आहेत.

संस्थेने स्वतःच्या उत्पन्नासाठी गोपालनही सुरू केले आहे. त्यामध्ये तीस गीर गाई आहेत, रोज ८० लिटर दूध संकलन होते. शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या अपंगांबरोबरच, शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन तसेच परंपरागत व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना साहाय्य करून रोजगारक्षम बनवले जाते. यातून १२ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. संस्थेचे कार्यालय नगर शहरातील गांधी मैदानाजवळ आहे. अजित माने हे संस्थेचे अध्यक्ष, तर दीपक बुरम हे सचिव आहेत.

अन्नसुरक्षा आणि नंदादीप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शारीरिक अपंगत्वामुळे अनेकांना हालचाल करत येत नाही, ते अंथरुणाला खिळून असतात. अठरा विसे दारिद्य्र असलेल्या कुटुंबांसाठी संस्थेने काही अभिनव योजना नुकत्याच सुरू केल्या आहेत. ५० लाभार्थ्यांना दरमहा ‘अन्नसुरक्षा’ योजनेतून घरपोच किराणा दिला जातो. बहुविकलांगांसाठी ‘नंदादीप निवृत्तिवेतन योजना’ सुरू केली आहे. त्यासाठी दरमहा ५०० रुपये औषधोपचारासाठी घरपोच दिले जातात. अनेक अपंग कुटुंबे सरकारी घरकुल योजनेसाठी पात्र ठरत नाहीत. दरवर्षी त्यांच्यापैकी दोन कुटुंबांना घरे बांधून देण्यासाठी संस्था पुढाकार घेणार आहे. त्यासाठी जागेची अडचण असून ग्रामपंचायतीने ती उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा संस्थापक अजित कुलकर्णी यांनी व्यक्त केली.