परभणी :अतिवृष्टी आणि पिक नुकसानीची मदत न मिळाल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्याने जिल्हाधिकार्यांची गाडी फोडल्याची घटना बुधवारी (दि.29) दुपारी घडली. संतोष रावण पैके (रा.चाटोरी ता.पालम) असे संतप्त शेतकर्याचे नाव आहे.
परभणी जिल्हयात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तिन्ही महिन्यात अतिवृष्टी झाली आहे. विशेषतः सप्टेंबर महिन्यात झालेले नुकसान हे सर्वाधिक आहे. सर्वदूर अनेकवेळा अतिवृष्टी झाल्याने आणि पुराचे पाणी शेतात शिरल्याने लाखो हेक्टर जमीनीवरील पिके वाहुन गेली आहेत. सुरुवातीच्या अतिवृष्टीचे १२८ कोटी रुपये अनुदान वितरित झाले आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचे अनुदानही वितरित होत आहे.
शासनाने जाहीर केलेली रक्कम आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असलेली रक्कम यात मोठी तफावत आढळून येत आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा होईल असे घोषित करण्यात आले होते. मात्र दिवाळीनंतर गुरुवारपासून (दि.२३) हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास प्रारंभ झाला. शासनाने जाहीर केलेली मदत दिवाळीपूर्वी न मिळाल्याने शेतकर्यांनी आंदोलने केली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने पिठलं भाकर आंदोलन करून काळी दिवाळी करण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयातच प्रवेशद्वारालगत पोर्चमध्ये असताना शेतकरी संतोष पैके यांच्या संतापाचा उद्रेक झाला. समोरच्या काचेवर या शेतकऱ्याने दगड घातल्याने काचेला तडे गेले. या प्रकारानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळावरून संबंधित शेतकऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
