यवतमाळमध्ये दर्डांविरुद्ध जनक्षोभ; संतप्त नागरिकांकडून घोषणाबाजी आणि तोडफोड

शाळेतील विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी दर्डा शिक्षणसंस्थेच्या पब्लिक स्कूलचे मुख्याधापक जेकब दास यांना शनिवारी पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्यांच्यावर आरोपींचा गुन्हा लपविल्याचा आरोप लावण्यात आला आहे.  तत्पूर्वी आज दिवसभरात संतप्त पालकांकडून दर्डांविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
शाळेतील दोन शिक्षकांनी विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याच्या निषेधार्थ यवतमाळमधील पालक आणि नागरिक आज सकाळी एकत्र आले. संतप्त नागरिकांनी दर्डांविरोधात घोषणाबाजी करत जवाहरलाल दर्डांच्या प्रेरणास्थळाची तोडफोड केली. याशिवाय, संतप्त महिला पालकांनी  शाळेचे सचिव किशोर दर्डा यांच्या घराबाहेर बांगड्या फोडून निषेध दर्शविला  दरम्यान, याप्रकरणी लवकरच चौकशी समिती नेमण्यात येणार आहे. तसेच, हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल आणि दोषींना कडक शिक्षा होईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.
IMG-20160702-WA0006
जवाहलरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीव्दारा संचालित इंग्रजी माध्यमाच्या यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस) या शाळेतील सहा वर्षे वयाच्या  विद्यार्थिनीचा लैंगिक छळाच्या आरोपाप्रकरणी याच शाळेतील यश बोरुंदिया आणि अमोल क्षीरसागर या दोन शिक्षकांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान, दोन्ही आरोपी शिक्षकांना पोलिसांनी अटक करताच संस्थेने तात्काळ त्यांना सेवामुक्त केले आहे. ही अधिकतम शिक्षेची कारवाई असून आम्ही पोलिसांना कळवल्याचे संस्थेचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी गुरुवारी लोकसत्ताला सांगितले. पोलीस जी काही कारवाई करतील त्याला आमचे पूर्ण सहकार्य राहील, असे संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांनी सांगितले.
IMG-20160702-WA0002