निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. त्याचबरोबर पक्षाचं घड्याळ हे चिन्हदेखील त्यांना बहाल केलं आहे. यावर आता वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांचं अभिनंदन केलं. तसंच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना टोला लगावला आहे. फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना मिळणार याचा आम्हाला विश्वास होताच. संख्याबळ त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे पक्ष आणि चिन्ह त्यांना मिळालं आहे. २०१९ मध्ये काही लोकांनी लोकशाहीचा कौल नाकारला होता. जनतेने दिलेल्या निकालाशी प्रतारणा करण्यात आली होती. २०१९ ला ज्या लोकांनी लोकशाहीचा मुडदा पाडला होता त्यांना लोकशाहीने जागा दाखवली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाचा निकाल आणि फडणवीस यांच्या टीकेला शरद पवार गटातील नेते आणि आमदार अनिल देशमुख यांनी उत्तर दिलं आहे. देशमुख म्हणाले, फडणवीसांना माहिती आहे की हे सगळं का झालं, कसं झालं, कुठून झालं आणि कोणी केलं. काही अदृष्य शक्तींचा वापर करून हे सगळं केलं गेलं आहे, हे सर्वांना माहिती आहे. उगाच काहीतरी सांगायचं, लोकांच्या समोर आपली बाजू मांडायची यासाठी ते काहीही वक्तव्ये करत आहेत. महाराष्ट्रातीला जतनेला सगळं काही माहिती आहे. शिवसेनेच्या बाबतीत जे काही झालं, काल राष्ट्रवादीच्या बाबतीत जे झालं त्याची जनतेला कल्पना आहे. महाराष्ट्रातील जनता हे सगळं घडवणाऱ्यांना योग्य वेळी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, निवडणूक आयोगाचा निकाल विरोधात गेल्यानंतर शरद पवार गटात अस्थिरता असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. यावर अनिल देशमुख म्हणाले, आमच्या पक्षात कुठेही अस्थिरता नाही. उलट भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमध्ये सर्वाधिक अस्थिरता आहे. कारण ते मूळचे भाजपाचे लोक आहेत. भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढले आणि जिंकले. परंतु, त्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत. बाहेरचे लोक आले आणि सर्वात आधी पंगतीला बसले. त्यामुळे भाजपा आमदारांमध्ये नाराजी आहे. यासह वेगवेगळी अमिषं दाखवून ज्या आमदारांना त्यांनी (अजित पवार) तिकडे नेलं आहे, त्यापैकी बहुतेकजण नाराज आहेत.
माजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले, मतदारसंघात विकासकामं करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधी हवा असतो. पैसे हवे असतात. त्यामुळे अनेक आमदार महायुतीत सहभागी झाले आहेत. परंतु, निवडणुका जवळ आल्यावर त्यातल्या बहुसंख्य आमदारांची एकेक करून घरवापसी सुरू होईल. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. वेळ आल्यावर हे आमदार शरद पवार यांच्याकडे परत येतील. अनेक आमदार शरद पवार आणि जयंत पाटील यांना भेटून गेले आहेत. त्यामुळे आगामी काळात निवडणुकांच्या आधी फुटलेले आमदार परत येतील.