Anil Deshmukh: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असा आरोप करण्यास सांगितलं होतं. मी तो आरोप केला नाही असं अनिल देशमुख म्हणाले. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांना अनिल देशमुख यांनी खुलं आव्हान दिलं आहे. फडणवीसांकडे क्लिप्स असतील तर त्यांनी जनतेसमोर आणाव्यात असं अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) म्हणाले. अनिल देशमुखांचे आरोप काय? "उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीसाठी पैसे घेतले असा आरोप करण्यास सांगण्यात आलं, तसंच आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार करुन तिला बाल्कनीतून ढकलून दिल्याचा आरोप करण्यास सांगण्यात आलं. मी यासाठी नकार दिला. त्यामुळे मला तुरुंगात जावं लागलं." अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी हे आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले माझ्याकडे क्लिप्स आहेत. हे पण वाचा- Sanjay Raut: “देवेंद्र फडणवीसांमुळेच राज्यात डर्टी पॉलिटिक्स” संजय राऊत यांचा आरोप देवेंद्र फडणवीस यांचं उत्तर काय होतं? अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप आमच्या सरकारच्या काळात नाही, तर मविआच्या काळात झाले होते. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांसमोर सुनावणीसाठी आले. मुख्य न्यायाधीशांनी अनिल देशमुख यांच्यावर एफआयआर करायला लावला आणि मग देशमुख तुरुंगात गेले. १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी अनिल देशमुख तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेले आहेत. ते दोषमुक्त झालेले नाहीत. अनिल देशमुख यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे दिले आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सचिन वाझे यांच्याबद्दल अनिल देशमुख काय बोलतात? आमच्यावर केलेल्या आरोपाबाबत ते काय बोलतात? याचा माझ्याकडे पुरावा आहे. जर माझ्यावर वेळ आली तर मला ते उघड करावे लागेल. जर रोज खोटे बोलून कुणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, देवेंद्र फडणवीस कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही.” अनिल देशमुख यांनी आता माझ्याकडे सगळे पुरावे आहेत असं म्हटलं आहे. तसंच देवेंद्र फडणवीसांकडे काही क्लिप्स असतील तर त्यांनी त्या जनेसमोर आणाव्यात असंही म्हटलं आहे. आता देवेंद्र फडणवीस हे आव्हान स्वीकारणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अनिल देशमुखांचं फडणवीसांना पुन्हा आव्हान "देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ज्या काही क्लिप्स आहेत त्यांनी त्या जनतेसमोर आणाव्यात असं माझं त्यांना आव्हान आहे. मला माहीत आहे त्यांच्याकडे कुठल्याच क्लिप्स नाहीत. जर त्यांच्याकडे क्लिप्स असतील तर त्या समोर आणाव्यात, माझ्याकडे जे पुरावे आहेत ते मी योग्य वेळ आली की समोर आणेन. तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा अत्यंत जवळचा माणूस माझ्याकडे पाठवला होता. त्या माणसाने माझं देवेंद्र फडणवीसांशी अनेकदा बोलणं करुन दिलं. मी जर त्यावेळी त्यांचं ऐकलं असतं तर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब हे सगळे अडचणीत आले असते." अशी माहिती अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी दिली. तसंच क्लिप्स असतील तर समोर आणा हे आव्हानच अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं. आता या नव्या आव्हानाबाबत देवेंद्र फडणवीस काय बोलणार? क्लिप्स समोर आणणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.