Anil Parab demand Yogesh Kadam’s Resignation : शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावे कांदिवलीत सावली नावाचा डान्सबार आहे. पोलिसांनी अलीकडेच या बारवर धाड टाकून २२ बारबालांना ताब्यात घेतलं होतं. “महाराष्ट्रात डान्सबारवर बंदी असतानाही हा बार कसा सुरू आहे?” असा प्रश्न देखील अनिल परब यांनी उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी योगेश कदम यांच्यावर कारवाई करण्याची, त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेचे (ठाकरे) आमदार अनिल परब म्हणाले, “आपल्या राज्यात महाराष्ट्र हॉटेल, उपाहार गृहे आणि मद्यपान कक्ष (बार रूम) यांमधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध घालण्याबाबत व (त्यामध्ये काम करणाऱ्या) महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम, २०१६ हा कायदा अस्तित्वात आहे. महिलांची प्रतिष्ठा राखणं हे या कायद्याचं नाव आहे. पण आज महाराष्ट्रात काय चाललंय? महिलांची प्रतिष्ठा राखली जातेय का?”
“मुंबईत सरकारच्या छायेखाली अजूनही डान्सबार चालू?”
परब म्हणाले, “मुंबईत कांदिवली येथे सावली बार अँड रेस्तराँ आहे. ३० मे २०२५ रोजी समता नगर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी व युनिट नंबर १२ मधील कर्मचाऱ्यांनी या बारवर धाड टाकली. त्यांच्याकडे माहिती आली होती की इथे डान्स बार चालतो. अश्लील नृत्य केली जातात आणि मुलींवर लाखो-करोडो रुपये उधळले जातात. तिथे नाचणाऱ्या मुली अश्लील हावभाव करतात. आपल्याकडे ऑर्केस्ट्राला परवानगी आहे. परंतु, हा आर्केस्ट्रा नव्हता याची पोलिसांना माहिती मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्या बारवर धाड टाकली.”
बारच्या परमिटवरील नाव वाचून धक्का बसला : परब
“या धाडीमध्ये पोलिसांनी २२ बारबालांना ताब्यात घेतलं. त्याचबरोबर २२ गिर्हाईकांना देखील पकडलं. यासह त्या बारमधील चार कर्मचारी मिळून एकूण ४८ जणांना ताब्यात घेतलं. यापैकी २२ पुरुषांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांनी तिथे जे काही घडतंय त्याचं चित्रण केलं होतं. बारबालांचं नाचणं, गिऱ्हाईकांशी लगट करणं, वगैरे गोष्टींचं चित्रण करून त्यांनी पंचनामा तयार केला. या घटनेची मी जेव्हा माहिती घेतली. एफआयआरची प्रत वाचली तेव्हा या बारचं परमिट कोणाच्या नावाने आहे हे वाचून मला धक्का बसला.”
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
शिवसेने (ठाकरे) आमदार म्हणाले, “या बारचं परमिट ज्योती रामदास कदम यांच्या नावाने होतं. माझ्या माहितीप्रमाणे हे गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्रींचं नाव आहे. यासह मला अजून एक प्रश्न पडला आहे की एखादा नेता ज्या खात्याचा पदभार सांभाळतो आहे किंवा जे मंत्रीपद उपभोगतो आहे, त्या खात्याशी संबंधित व्यवसाय तो करू शकतो का? महसूल राज्यमंत्र्यांच्या घरात हे काय चाललंय? गृहराज्यमंत्र्यांच्या घरात डान्सबरचं परमिट आहे हे गंभीर असून सरकार योगेश कदम यांच्यावर कारवाई करणार का?”