Anjali Damania on Rohit Pawar Viral Video : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत आमदार रोहित पवार हे कर्जत-जामखेड नगर परिषदेतील अधिकाऱ्यावर संतापल्याचं पाहायला मिळत आहेत. रोहित पवार यांनी त्या अधिकाऱ्याची कानउघडणी केल्याचं दिसत आहे. तसेच रोहित पवार त्या अधिकाऱ्याला, मिजासखोर व अहंकारी म्हणाले. “इतके दिवस काय गोट्या खेळत होतास का, हे लोक पिसाळले तर काय करतील”, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्याला दम दिला.

दरम्यान, या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडीओ पाहून रोहित पवार यांची थेट त्यांच्या काकांबरोबर म्हणजेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी तुलना केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील बऱ्याचदा प्रसारमाध्यमांसमोर, लोकांसमोरच अधिकाऱ्यांना फैलावर घेतात, अधिकाऱ्यांची कानउघडणी करतात. यामुळे बऱ्याचदा अधिकारी अजित पवारांसमोर दबकून असतात. परंतु, अजित पवारांच्या या कृतीवर टीका देखील होते. अंजली दमानिया यांनी रोहित पवारांच्या दमबाजीची अजित पवारांशी तुलना केली आहे.

अंजली दमानिया यांनी यासंदर्भात एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की जसे काका तसाच पुतण्या ?

अंजली दमानिया काय म्हणाल्या?

“जसे काका तसाच पुतण्या? रोहित पवारांची ही काय भाषा? महाराष्ट्रात सरकारी कामे निकृष्ट असतात यात काहीच शंका नाही. यावर अधिकाऱ्यांना कडक शब्दांत जाब विचारला पाहिजे यातही काही शंका नाही, पण ही भाषा? अधिकाऱ्यांना काय गोट्या खेळत होता काय? असं म्हणणं योग्य आहे का? खिशातून हात काढ, मिजासखोर तू बोलू नकोस तुला सांगतोय, हे शब्द रोहित पवार लोकांदेखत अधिकाऱ्यांना बोलतात? निकृष्ट कामं स्वतः पाहून त्या कामांची आणि त्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची मागणी करणं योग्य आहे. पण सार्वजनिकरित्या अपमान करणं शोभतं का?”

नेमकी घटना काय?

रोहित पवार यांनी जामखेडमधील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी विभागीय अधिकाऱ्यांची आमसभा घेतली होती. यावेळी नागरिकांनी त्यांच्या परिसरातील गटाराच्या नियोजनाशी संबंधित समस्या उपस्थित केल्यानंतर एका अधिकाऱ्याने मोघम उत्तरं देण्यास सुरुवात केली. तसेच त्या अधिकाऱ्याची देहबोली गंभीर दिसत नसल्याने रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला. रोहित पवार त्या अधिकाऱ्याला म्हणाले, “ए… आतापर्यंत तू गोट्या खेळत होतास का? हे बावळट लोक आहेत का? ही वेडी माणसं आहेत का? खिशातला हात आधी काढ. लय शहाणा बनू नको. खूप मोठं काम करतोयस ते आम्हाला माहिती आहे. मिजासखोर बनू नकोस. या लोकांनी दाखवलेलं काम खराब आहे. हा तुमच्या बापाचा पैसा नाही. तू कुठलाही असशील, परंतु या लोकांना इथेच राहायचं आहे. ही खराब कामं आहेत आणि तू उद्या बघतो, करतो अशी उत्तर देतोयस.

रोहित पवारांचं अंजली दमानियांना उत्तर

दरम्यान, अंजली दमानिया यांच्या टीकेला रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी देखील एक्सवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटलं आहे की अंजलीताई, आपला माझ्यावरचा राग मी समजू शकतो, पण एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याने केलेल्या निकृष्ट कामाचा सामान्य जनतेला त्रास होत असेल तर अशावेळी सामान्य माणसाची भावनाही आपणही समजून घेतली पाहिजे.

“एखादा अधिकारी जेंव्हा बघतो… करतो… अशी वेळकाढू भाषा वापरत असेल तेव्हा कदाचित आपल्यासारख्याला लगेच फरक पडणार नाही पण सामान्य आणि गरीब माणसासाठी तो जीवन-मरणाचा विषय असतो. लोकप्रतिनिधीसमोर अधिकारी धडधडीत खोटं बोलत असतील तर तिथं विविध कामासाठी शासकीय कार्यालयात जाणाऱ्या सामान्य माणसासोबत ते कसं वागत असतील, याची कल्पना करा. आम्ही मोठमोठा भ्रष्टाचार उघड करुनही त्याचे पुरावे मागणाऱ्या नेत्यांप्रमाणे काही अधिकारीही गेंड्याच्या कातडीचे झाले आहेत.”

“उंचावरून शेळा हाकणं सोप्पं असतं”, रोहित पवारांचा टोला

“दुसरं म्हणजे, चांगल्या अधिकाऱ्यांचं मी कायमच कौतुक करतो, परवा कर्जतच्या आमसभेत तहसीलदार आणि बीडीओ या दोन्ही प्रामाणिक अधिकाऱ्यांचं कौतुक केल्याचा व्हिडिओ शोधला तर तुम्हाला मिळून जाईल. पण चुकीचं काम करणारे, वारंवार सांगूनही सुधारत नसतील तर अशा अधिकाऱ्यांना धारेवर धरणं चुकीचं आहे का? कधी कधी भावनेच्या भरात संताप अनावर होतो, पण याची कारणंही आपण समजून घेतली पाहिजेत. उंटावरून शेळ्या हाकणं सोप्पं असतं, पण प्रत्यक्ष वस्तूस्थिती आणि सामान्य जनतेला होणारा त्रास खूप वेगळा असतो.”

…तर आधीच सत्तेत जाऊन बसलो असतो : रोहित पवार

रोहित पवार म्हणाले, “मी ज्या भूमिका घेतो त्या आपल्या भूमिकांप्रमाणेच प्रामाणिक असतात, फक्त सिलेक्टिव्ह नसतात. अन्यथा कधीच सत्तेत जाऊन बसलो असतो. धन्यवाद!”