Anjali Damania : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेचे राजकीय पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक पोस्ट लिहिली असून आपण लवकरच अजित पवार यांना भेटणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

धनंजय मुंडे हे सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत त्यांच्यावर देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचे आरोप झाल्याने आधीच अस्थिर असलेल्या जिल्ह्यातील परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. त्यामुळेही या प्रकरणी न्यायालयीन हस्तक्षेपाची गरज असल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. लोकप्रतिनिधीने जनहितार्थ काम करणे अपेक्षित आहे. म्हणूनच धनंजय मुंडे यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांची निवडणूक आयोगानेही चौकशी करणे गरजेचे आहे. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्यापासून दूर ठेवणे गरजेचं आहे अशी मागणी अंजली दमानियांनी केली होती. आता अंजली दमानियांनी ( Anjali Damania ) एक पोस्ट करुन अजित पवारांकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे.

काय आहे अंजली दमानियांची पोस्ट?

“धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे. अजित पवार आणि माझा ३६ चा आकडा आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन, पण बीड चे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळीमा फासणारे आहे. अशा हैवान लोकांना थारा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता. पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना? ते पुरावे घेऊन जाण्यासाठी वेळ मागितली आहे. बघू कधी वेळ देतात” अशी पोस्ट अंजली दमानिया ( Anjali Damania ) यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संतोष देशमुख हत्या प्रकरण काय?

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण आणि हत्या झाली, त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं, यावर त्यांच्या कुटुंबीयांनी भाष्य केलं आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण झालं, तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे आतेभाऊ शिवराज देशमुख हे देखील होते. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटले होते. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी ( Anjali Damania ) हा प्रश्न लावून धरला आहे.