राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक आणि अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी म्हणजेच ५ मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. ३ मे रोजी त्यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. राजीनामा मागे घेताना शरद पवार म्हणाले, मी तुम्हा सगळ्यांच्या भावनांचा अपमान करु इच्छित नाही. माझा निवृत्ती घेण्याचा निर्णय ऐकल्यानंतर कार्यकर्त्यांकडून तीव्र भावना उमटल्या. तसेच मी निर्णयाचा पुनर्विचार करावा म्हणून माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटीत होऊन एकमुखाने आवाहन केलं.” दरम्यान, शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याची घोषणा करण्यासाठी जी पत्रकार परिषद आयोजित केली होती, तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार अनुपस्थित होते. यावरुन वेगवेगळ्या राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते अजित पवार उपस्थित नसल्याबाबत खुद्द शरद पवारांनीच स्पष्टीकरण दिलं. शरद पवार म्हणाले की, “प्रत्येकजण या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाही. काही लोक इथे आहेत, तर काही लोक इथे उपस्थित नाहीत.”

दरम्यान, अजित पवारांबाबत सातत्याने वेगवेगळे दावे करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज आणखी एक मोठा दावा केला आहे. दमानिया म्हणाल्य की, अजित पवारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी झाली आहे. परंतु मला नाही वाटत ते इतके शांत बसतील. येत्या काही दिवसात, किंवा काही महिन्यात, कदाचित दिवाळीपर्यंत ते त्यांच्या आमदरांना एकत्र करून मोठा दगाफटका करतील यात काही शंका नाही.

हे ही वाचा >> राष्ट्रवादीचा एक गट अजित पवारांबरोबर बाहेर पडण्याची सतत चर्चा का? शरद पवार म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दमानिया म्हणाल्या, या सर्व राजकारण्यांनी राजकारणाचा उकिरडा करून ठेवला आहे. यावेळी दमानिया यांना विचारण्यात आलं की, शरद पवार आता पुन्हा राजीनामा देतील का? या प्रश्नावर दमानिया म्हणाल्या, मला नाही वाटत शरद पवार आता राजीनामा द्यायच्या फंदात पडतील. परंतु ते कधीही आणि काहीही करू शकतात.