Anjali Damania on Vaishnavi Hagawane Death: गेल्या आठवड्याभरापासून चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. गुरुवारी वैष्णवी हगवणेची मोठी जाऊ मयुरीनं माध्यमांसमोर केलेल्या आरोपांमुळे हगवणे कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यातच गुरुवारी रात्री उशीरा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी स्वारगेट परिसरातून वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांना अटक केल्यानंतर आता पूर्ण हगवणे कुटुंब अटकेत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या राजकीय संबंधांची चर्चा होत असताना अंजली दमानियांनी केलेली एक पोस्ट व्हायरल होत आहे.

अंजली दमानियांची पवार कुटुंबावर टीका

अंजली दमानियांनी गुरुवारी रात्री एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये थेट पवार कुटुंबाला लक्ष्य केलं आहे. “करिश्मा हगवणेबरोबर सुनेत्रा पवार? याच करिश्मा हगवणेबरोबर सुप्रिया सुळे व शरद पवारही आहेत? हेही वरवरचे संबंध आहेत का? आज अजित पवार म्हणतात एका लग्नात गेलो आणि माझ्या मागे लचांड लागलं? इतक्या गंभीर विषयावर अशी भाषा? हे संवेदनशील असू शकत नाहीत. धक्कादायक”, असं दमानियांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

अंजली दमानियांनी या पोस्टसोबत एक व्हिडीओ क्लिप आणि दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये राज्यसभा खासदार व अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या एका दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमाला गेल्याचं दिसत आहे. त्यात सुनेत्रा पवार यांच्याबरोबर वैष्णवी हगवणेचा पती शशांकची नणंद करिश्माही दिसत आहे. त्यानंतर एका फोटोमध्ये करिश्मा हगवणे व सुप्रिया सुळे दिसत आहेत. तर एका फोटोमध्ये शरद पवारांच्या कार्यालयात करिश्मा भेटण्यासाठी गेल्याचं दिसत आहे.

वैष्णवीचा सासरा व दीराला अटक

दरम्यान, वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे यांना गुरुवारी रात्री उशीरा पोलिसांनी अटक केली. त्यासंदर्भात एबीपीशी बोलताना अंजली दमानियांनी प्रतिक्रिया दिली आहे. “”त्या दोघांना अटक झाली हे ऐकून बरं झालं. पण गंमत अशी आहे की ते दोघं पुण्यातच होते. पण ६-७ दिवस ते अटकेपासून लांब राहू शकले. त्यांना अटक करण्यासाठी इतके दिवस लागले याचं वाईट वाटतंय. पुण्यात त्यांना पाठिशी घालणारं कुणीतरी नक्कीच होतं. आता सगळ्यांनी आवाज उठवल्यानंतर त्यांना अटक झाली आहे”, असं त्या म्हणाल्या.

नेमकं काय आहे प्रकरण?

वैष्णवी कस्पटेचा शशांक हगवणेशी २०२२ मध्ये प्रेमविवाह झाला होता. पण लग्नानंतर काही महिन्यांतच दोघांमध्ये वाद होऊ लागले. यासंदर्भात वैष्णवीनं तिच्या मैत्रिणीला एकदा केलेल्या फोन कॉलची ऑडिओ क्लिपदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शुक्रवारी १६ मे रोजी वैष्णवीनं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. यानंतर या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत वैष्णवीच्या सासरकडच्या सर्व पाच जणांना अटक करण्यात आली आहे.