काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे आणि बीएमसीचे माजी अधिकारी जी.आर. खैरनार यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, ते दोघेही आता कुठे दिसत नाही, अशी टीका शरद पवार यांनी आण्णा हजारे यांच्यावर केली होती. दरम्यान, या टीकेला आता आण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मंगळवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “लोकसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरे भाजपाबरोबर जातील”, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्यानंतर शरद पवार म्हणाले…

काय म्हणाले अण्णा हजारे?

“शरद पवार यांना १०-१२ वर्षांनी जाग आली आहे. त्यांना अचानक जाग कशी आली मला माहिती नाही. त्यावेळी मी केलेल्या आंदोलनामुळे शरद पवार यांचे अनेक मंत्री घरी गेले होते. तसेच मी शरद पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील यांच्याविरोधातही आंदोलन केले होते. कदाचित त्याचा राग त्यांना असावा. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका केली”, असं प्रत्युत्तर अण्णा हजारे यांनी दिलं.

पुढे बोलताना त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनाही टोला लगावला. “शरद पवार यांच्या पक्षातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही मध्यंतरी माझ्यावर टीका केली होती. मात्र, प्रत्येक पक्षात हे समविचारी माणसं असतात, तसेच शरद पवार आणि जितेंद्र आव्हाड हे समविचारी लोक आहेत, ते एकत्र राहणारच”, असं अण्णा हजारे म्हणाले.

हेही वाचा – “…तर केंद्रातही महाविकास आघाडीसारखा प्रयोग”, शरद पवारांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “प्रयत्नांची पराकाष्टा करून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शरद पवार नेमकं काय म्हणाले होते?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. यावेळी बोलताना त्यांनी अण्ण हजारेंना लक्ष्य केलं होते. ‘माझ्याविरोधात ट्रकभर पुरावे असल्याचा दावा तत्कालीन उपायुक्त जी.आर. खैरनार आणि अण्णा हजारे यांनी केला होता. या आरोपांची चौकशीही झाली होती. मात्र, या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे पुराव्यांनीशी समोर आले होते. माझ्यावर आरोप करणारे खैरनार, अण्णा हजारे इतरांचे काय झाले? ते आज कुठे आहेत?”, असा प्रश्न शरद पवार यांनी विचारला होता.