राज्य सरकारने नुकताच सुपरमार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला भाजपाकडून तीव्र आक्षेप घेण्यात आला असून राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राज्य सरकारने हा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी येत्या १४ फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता अण्णांच्या या आंदोलनामुळे राज्य सरकारवर दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

अण्णा हजारेंचं राज्य सरकारला पत्र

अण्णा हजारे यांनी यासंदर्भात याआधी देखील राज्य सरकारला उपोषणाचा इशारा दिला होता. त्यासंदर्भात पत्रच अण्णा हजारेंनी राज्य सरकारला पाठवलं होतं. “सरकारच्या सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री करण्याच्या नियमांसंदर्भात वाईन विक्रीच्या निर्णयामुळे राज्यातील मुलांच्यावर जी आमची खरी संपत्ती आहे. या बालकामध्येच उद्याचे महापुरूष निर्माण होणार आहेत. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही युवाशक्तीच राज्य आणि राष्ट्र घडवू शकेल यावर आमचा विश्वास आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक परिवाराचे उज्वल भविष्य ज्या मुलींना, युवतींना घडवायचे, जिच्या हाती पाळण्याची दोरी। ती जगाला उद्धारी। या युवतींवर या वाईनच्या वातावरणाचा काय दुष्परिणाम होईल, एकूण समाजावर काय परिणाम होतील याचा सरकारने विचार केलेला दिसत नाही”, असा आक्षेप अण्णा हजारेंनी पत्रातून घेतला होता.

“फक्त मिळणाऱ्या महसुलाचा मर्यादीत विचार केलेला दिसतो. ज्या सत्तेमध्ये समाज, राज्य, राष्ट्र हिताचा विचार नसेल अशी सत्ता काय कामाची? ज्यांनी राज्य चालवायचे आहे त्यांनी जनतेचा सल्ला न घेता आपल्या मनाला जे योग्य वाटते असे निर्णय घेणे म्हणजे लोकशाही नव्हे. लोकशाही ही लोकांची आहे. ती लोकांची, लोकांनी, लोकसहभागातून चालविली पाहिजे अन्यथा इंग्रजांच्या आणि आमच्या हुकूमशाहीत फरक राहणार नाही”, असं देखील अण्णा हजारे आपल्या पत्रात म्हणाले होते.

“वाईन आणि दारू यात जमीन-आस्मानाचा फरक, पण काही लोक…”, अजित पवारांचा विरोध करणाऱ्यांना टोला!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काय आहे सरकारचा निर्णय?

राज्य सरकारने २७ जानेवारी रोजी राज्यातील सुपर मार्केट आणि वॉक-इन स्टोअर्समध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय जाहीर केला. यानुसार, ‘महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असून आता १००० चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे”, अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.