सांगली : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी बुधवारी मुंबईत झालेल्या एका विशेष कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासमवेत त्यांचे पुत्र ॲड. चिमण डांगे आणि विश्वनाथ डांगे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपप्रवेश केला.
गेल्या आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील व जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या पुढाकाराने श्री. डांगे यांनी मुंबईत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेउन पक्षप्रवेशाची तयारी दर्शवली होती. मंगळवारी रात्री प्रदेशाध्यक्ष चव्हाण, पालकमंत्री पाटील व कदम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाबाबत चर्चाही झाली.
बुधवारी सायंकाळी प्रवेशाचा सोपस्कार पार पडला. प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी डांगे यांचे स्वागत केले. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि चव्हाण यांनी डांगे यांचा पक्षात मान राखला जाईल, असे सांगत दोन्ही पुत्रांवरही योग्य ती जबाबदारी सोपविण्यात येईल, असे सांगितले.
श्री. डांगे हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. मध्यंतरीच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या पक्षात ते कार्यरत होते. मात्र, सत्ताबदलानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
डांगे यांच्या पक्षप्रवेशावेळी आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख आदी उपस्थित होते.