सांगली : नवीन इमारतीसाठी करण्यात आलेला खर्च, कर्मचारी आकृतीबंध आणि लाभांश यावरून सोमवारी झालेली प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा घोषणा, प्रतिघोषणांनी गाजली. विरोधकांनी प्रश्न उपस्थित करण्यासाठी वारंवार मागणी करूनही ध्वनीवर्धक हाती देण्यात आला नाही, तर विषय पत्रिकेवरील सर्व विषय बहुमताने मंजूर करून सभासदांनी संचालक मंडळाच्या कारभारावर विश्वास व्यक्त केला असल्याचे अध्यक्ष संतोष जगताप व सत्ताधारी गटाचे नेते विनायक शिंदे यांनी केला.

सांगलीतील डेक्कन मॅन्यूफॅक्चरिंगच्या सभागृहात श्री. जगताप यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक बँकेची वार्षिक सभा पार पडली. प्रारंभी अध्यक्ष जगताप यांनी प्रास्ताविक केल्यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी लाड यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले. तर व्यवस्थापक महांतेश इटंगी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन सुरू करताच गोंधळाला सुरूवात झाली.

नफ्यातील रक्कम इमारतीसाठी वर्ग केल्याने सभासद हक्काच्या लाभांशाला मुकले असल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधारी गटावर आक्षेप घेतले, तर कर्मचारी आकृतीबंध मंजूर करून नव्याने नोकरभरती करण्याचा डाव असल्याचा आरोपही करण्यात आला. जुनी इमारत पूरपट्ट्यात येत असल्याचे सांगत नवीन इमारत बांधण्यात आली असली तरी यात सभासदांचा काय लाभ झाला, केवळ मक्केदारीतून पैसे मिळवण्यासाठीचा हा उद्योग असल्याचा आरोप बँक बचाव समितीचे नेते यु.टी.जाधव, शशिकांत बजबळे, अरविंद गावडे, सुनिल गुरव आदी विरोधकांनी केला.

दरम्यान, अध्यक्ष जगताप यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन करत सभासदांकडून प्रतिसाद मागितला असता सत्ताधारी गटाच्या सदस्यांनी मंजूर, मंजूरच्या घोषणा देत संचालक मंडळाने घेतलेल्या विविध निर्णयाचे स्वागत केले. मृत सभासदांसाठी सुरू करण्यात आलेल्या संजीवन निधीतून वाढीव मदत देण्याला मान्यता देण्यात आली. तसेच १५ लाखांपर्यंत कर्ज मर्यादा करण्यालाही मान्यता देण्यात आली. विरोधकांकडून वारंवार ध्वनी वर्धकाची मागणी करण्यात येत होती. अध्यक्ष शांत राहिला तर प्रश्न विचारण्यास मुभा देउ असे सांगत एकाही सभासदांने मुदतीत लेखी प्रश्न दिेलेला नसल्याचे सांगितले.

दरम्यान, ध्वनी वर्धक हाती मिळत नसल्याचे पाहून विरोधकांनी सभागृहाबाहेर येउन समांतर सभा घेत अध्यक्ष व संचालक मंडळाचा निषेध करत प्रश्न उपस्थित करण्याच्या सदस्यांचा हक्क डावलून झालेली ही सभा बेकायदेशीरपणे झाल्याचा दावा बँक बचाव समितीचे श्री. जाधव यांनी केला. तर नव्याने नोकरभरती, पदोन्नती याबाबत आपण सहकार विभागाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले.