जायकवाडीचे पाणी थांबवण्यासाठी जिल्ह्य़ात राज्य सरकारच्या विरोधातील असंतोष संघटित होत असतानाच आता आंदोलनाला अधिक धार येऊ लागली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास पद्मश्री विखे कारखान्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. संगमनेरकरांनी भंडारद-याचे पाणी तालुक्याच्या पुढे न जाऊ देण्याचा इशारा दिला असून, श्रीरामपूरमध्येही मंगळवारी घेराव घालण्यात आला.
भंडारदरा व मुळा धरणातून मराठवाडय़ातील जायकवाडीसाठी सोडण्यात आलेले पाणी थांबवणे विविध पातळ्यांवर मुश्कील झाले असले तरी नगर जिल्ह्य़ातील आंदोलनांची धार कमी झालेली नाही. हे पाणी सोडण्यास आता विरोध एकवटू लागला आहे. भंडारदरा धरणातून सोडलेल्या पाण्याने पुढचे निळवंडे धरण भरून घेतले जात आहे. ते पूर्ण भरल्यानंतरच हे पाणी पुढे प्रवरा नदीद्वारे जायकवाडी झेपावेल. मात्र संगमनेर तालुक्यात पोणी पोहोचेपर्यंत धरणाचे चाक बंद करू असा इशारा देण्यात आला आहे.
जायकवाडीच्या पाण्याच्या निमित्ताने प्रदीर्घ काळानंतर एखाद्या विषयावर जिल्ह्य़ात सर्वच राजकीय पक्षांचे नेते संघटित होऊ लागले आहेत. पदमश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. श्रीरामपूर येथे पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांना घेराव घालण्यात आला.