शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेली टीका आगामी काळात त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. कारण सुषमा अंधारे यांनी शिरसाट यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या सभेत शिरसाट म्हणाले होते की, सुषमा अंधारे सगळ्यांनाच माझा भाऊ म्हणतात, पण त्या बाईने काय-काय लफडी केली आहेत, तिलाच माहिती. याविरोधात अंधारे यांनी महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.

दरम्यान, या तक्रारीनंतर आपण महिला आयोगाला सामोरे जाणार असल्याचं शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच शिरसाट म्हणाले की, यापुढे आमच्या चारित्र्यावर बोलायचा कोणी प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तर देईन. मी कोणाला घाबरत नाही, समोर कोणीही असलं तरी मी भीत नाही. तुम्ही इतरांचा अपमान कराल तर ते मला सहन होणार नाही.

“राजकारण गेलं उडत…”

शिरसाट अधिक आक्रमक होत म्हणाले, राजकारण गेलं उडत. राजकारण हा माझा पोट भरण्याचा धंदा नाही, ज्यांचा तो धंदा आहे ते लोक अशी नाटकं करत आहेत. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. माझ्याविरोधात अपशब्द किंवा खालच्या पातळीवर जाऊन कोणी बोललं तर माझ्याही कुटुंबाला त्रास होतो. जर कोणी बोललं तर त्याला त्याच भाषेत मी उत्तर देईन