अहिल्यानगर: नेवाशातील पुनतगाव फाट्याजवळ झालेल्या कार व मोटरसायकल अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर तिसरा जखमी झाला. अपघात आज, शुक्रवारी दुपारी झाला. अमोल उर्फ शिवाजी भाऊसाहेब दारकुंडे (वय ३२) व निवृत्ती ज्ञानेश्वर पवार (वय ५६, दोघे रा. पुनतगाव नेवासा) अशी दोघा मृतांची नावे आहेत. दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम भीमा आढाव (रा. शिरसगाव, येवला, नाशिक) हे आपल्या दोन मित्रांसह मारुती कारने श्रीरामपूरहून नेवासा येथे मोटर खरेदी करण्यासाठी येत असताना पुनतगाव फाट्याजवळील वळणावर समोरून मोटरसायकलवर येणारे तिघेजण घसरून, फरपटत कारच्या चाकाखाली आले. त्यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले तर तिसरा व्यक्ती बाजूला फेकला गेला. अपघातानंतर कारचालक विक्रम आढाव यांनी इतर वाहन चालकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेत अपघाताची माहिती दिली.
घटनेनंतर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पोलिसांना घटनास्थळी पाठवले व जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. नेवासा पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक अमोल पवार अधिक तपास करत आहेत.