scorecardresearch

४८ जागा लढवायला आम्ही मूर्ख आहोत का?, संजय शिरसाटांचा बावनकुळेंवर पलटवार

बावनकुळेंनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत, असं म्हणत संजय शिरसाटांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

sanjay shirsat, navneet rana
संजय शिरसाट संग्रहित छायाचित्र

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिंदे गटाला ४८ जागा देणार असल्याचं विधान केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंचा तो व्हिडीओसुद्धा भाजपकडून तातडीने हटवण्यात आला आहे. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शिरसाटांनी चंद्रशेखर बावनकुळेंवर पलटवार केला आहे. बावनकुळेंनी केलेल्या स्टेटमेंटमध्ये काही दम नाही. बावनकुळेंना एवढे कोणी अधिकार दिलेले नाहीत, असं म्हणत संजय शिरसाटांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिउत्साहात ते वक्तव्य केलंय. अशी स्टेटमेंट दिल्यानं युतीमध्ये बेबनाव येतो. याची जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे, असा सल्लाही संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना दिला आहे. ४८ जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का? याची वरिष्ठ पातळीवर बैठक होईल. त्या बैठकीत वरिष्ठ जो निर्णय घेतील तो त्यांना जाहीर करू द्या. तुम्हाला अधिकार कोणी दिला. अशामुळे पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल होते, असंही ते म्हणालेत.

खरं तर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप २४० जागा लढणार असून, शिंदे गटाकडे ५० हून अधिक जागा लढण्यासाठी नेतेच नाहीत, असे म्हणत शिंदे गटाला ४८ जागा देणार आहोत, असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं होतं. विशेष म्हणजे युतीतील जागावाटपाबाबत संयम न ठेवता वक्तव्य केल्याने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगेच सारवासारव करावी लागली होती. चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष असताना केलेल्या अनेक वक्तव्यांमुळे भाजपची पंचाईत झाली होती, तशीच वेळ बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे यावेळी भाजपवर आली.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत शुक्रवारी बोलताना बावनकुळेंनी हे विधान केलं होतं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप २४० जागा लढविणार असल्याचे सांगून पदाधिकाऱ्यांनी रात्रंदिवस काम करीत निवडणूक तयारीला लागावे, अशा सूचना दिल्या होत्या. शिंदे गटाकडे ५० हून अधिक आमदार नसल्याने त्याहून अधिक जागा लढण्यास माणसेच नाहीत, असेही बावनकुळे म्हणाले होते. त्यांचे भाषण समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यात आले होते. त्यानंतर तो व्हिडीओ हटवून त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी खुलासाही केलाय.  

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 13:23 IST