दक्षिण आणि ईशान्य मुंबईत शिवसेनेचं प्राबल्य आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपासंदर्भात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध मतदारसंघातून जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे या समस्येवर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडून काय निर्णय घेतला जातोय, याकडे सर्वांचं लक्ष आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या.
“वाद झाले असतील तर कोणताही तिढा शरद पवार सोडवू शकतील. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ घेऊन कसं बोलायचं याचे आदर्श शरद पवार आहेत. मग ते वाद कुटुंबातील असो, पक्षातील असो किंवा वाटाघाटी करण्यासंदर्भात वाद असतील. सरकारमध्ये असताना पवारांवर ही जबाबदारी टाकली जायची. त्यामुळे मला याबाबत काही वाटत नाही”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या, “महिन्याभरात आचारसंहिता लागेल. त्यामुळे सगळेच इच्छुक आहेत. आज प्रत्येक आघाडी इलेक्शन मूडमध्ये आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत पुढच्या आठ दहा दिवसांत होईल. आमचे प्रवक्ते याबाबत जाहीर सांगतील.”
हेही वाचा >> BMC Election 2022 : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील मराठी बहुल भागात शिवसेनेची ताकद कायम रहाणार का ?
दरम्यान, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत खासदार आहेत. ईशान्य मुंबईतून भाजपाचे मनोज कोटक खासदार आहेत. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस यांच्यात वाद सुरू आहे. तर ईशान्य मुंबईबाबतही तिन्ही पक्ष आग्रही आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळतेय हे पाहावं लागणार आहे.
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा कायम राखण्यासाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट आणि खासदार अरविंद सावंत यांच्या समोर मोठे आव्हान असेल. त्यातच महाविकास आघाडीत काँग्रेसने मिलिंद देवरा यांच्यासाठी या जागेवर दावा केल्याने विरोधी आघाडीत एकवाक्यता दिसत नाही. दुसरीकडे, भाजपमध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनाही लोकसभेचे वेध लागल्याने भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते याची उत्सुकता आहे.
२०१९च्या निवडणुकीत उमेदवारांना मिळालेली मते :
अरविंद सावंत (शिवसेना) – ४,२१,९३७
मिलिंद देवरा (काँग्रेस) -३,२१,८७०