काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन भाजपाने हल्लाबोल केला आहे. नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं नाना पटोले म्हणाले असल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठलं आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले यांनी हे वक्तव्य केलं. त्यानंतर आता भाजपाकडून नाना पटोलेंच्या अटकेंची मागणी करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्र्यांपासून भाजपाच्या नेत्यापर्यंत सर्वांनीच नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपा आमदार आशिष शेलार यांनीही नाना पटोलेंवर टीका केली आहे.

“पाकिस्तानच्या सीमेजवळ काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेत गलथानपणा होतो. आता नक्षलवादी जिल्ह्यांच्या सीमेवर जाऊन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मोदींना मारु शकतो म्हणतात. काही कट शिजतोय का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतच्या कुठल्या कटात नाना पटोले सहभागी आहेत का?  त्यामुळे नाना पटोले यांना अटक करुन त्यांची नार्को टेस्ट करा! आता नाना सारवासारव करताना, गावगुंडांला मारण्याबाबत बोललो असे जर म्हणत असतील तर ते स्वतःला भिकू म्हात्रे समजतात का?,” असा सवाल आशिष शेलार यांनी ट्विट करुन विचारला आहे.

“जे मोदी फसवणूक करुन या देशातून पळाले त्याबद्दल..”; मोदींवरील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची प्रतिक्रिया

काय म्हणाले होते नाना पटोले?

“मी एवढय़ा वर्षांच्या राजकारणात एकही शाळा काढली नाही किंवा ठेकेदारी केली नाही. जो आला, त्याला वाटत गेलो, म्हणूनच मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो. म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आले नाही,’’ असं नाना पटोले म्हणाले होते. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात पटोले यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे म्हणत भाजपा चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यानंतर नाना पटोले यांनीही याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

“मी त्या गावगुंड मोदीबद्दल बोललो आहे”; व्हायरल व्हिडीओवर नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

नाना पटोलेंचे स्पष्टीकरण

“भंडारा पोलिसांनी तथाकथित मोदीला पकडले आहे. पोलिसांकडून लोकांचा जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे. पण भाजपा बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न जे केंद्र सरकारने निर्माण करुन ठेवले आहेत. या सगळ्या प्रश्नांवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपा एखाद्या मुद्द्याला घेऊन अर्थाचा अनर्थ करुन महाराष्ट्रातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपाच्या पायाखालची वाळू सरकल्याने ते या पद्धतीचे कृत्य करत आहेत. पंतप्रधान हे पद देशाचे पद आहे कोणत्याही एका पक्षाचे नाही हे काँग्रेसला चांगलेच समजते. काँग्रेसने देशाला मोठे केले आहे. पंतप्रधानांचा गौरव काँग्रेसला माहिती आहे. ज्या पद्धतीने भाजपा सगळे करोनाचे नियम तोडून आंदोलन करत आहेत. कोणत्याही कारणाशिवाय माझ्या अटकेची मागणी करत आहेत. मी भंडारा पोलिसांना याबाबत तपास करण्यास सांगितले आहे. लोकांनी तक्रार केलेला गावगुंड तिथे नसेल तर निश्चितपणे माझ्यावर कारवाई करा,” असे नाना पटोले म्हणाले.