राजकारणात अनेक लोक भेटतात. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात. माझ्या जीवनात संयम बाळगण्याची शिकवण पहिल्या भेटीत अरुणभाई नगरविकास राज्यमंत्री असताना मिळाली. ते अध्यक्ष असताना भाषणांसाठी त्यांचे मार्गदर्शन मिळाले. अरुणभाईंसारखी नि:स्वार्थ, पथदर्शी व्यक्ती दुर्मीळ आहे. ते निव्वळ कर्तृत्वानेच नाही तर आचरणाने देखील मोठे आहेत, अशी स्तुतीसुमने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी यांच्यावर उधळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अरूणभाईंचा तसेच चोपडा पीपल्स बँकेच्या अमृत महोत्सवानिमित्त चोपडा येथील प्रताप विद्या मंदिरात आयोजित कृतज्ञता सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अरूणभाईंचा सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार होते. यावेळी फडणीस यांनी अरूणभाईंविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. विधीमंडळाच्या सभागृहात आपण नवखे असताना अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडून नेहमी प्रोत्साहन मिळे. भाषण चांगले झाले की चिठ्ठय़ा पाठवून कौतुक करीत. त्यांच्या चिठ्ठय़ा आजही आपण जपून ठेवल्या असल्याची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली.

यावेळी उपस्थितांनी अरूणभाईंच्या कार्याबद्दल तसेच त्यांच्या स्वभावाचे दिलखुलास कौतुक केले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्तृत्व आणि नम्रता दोन्ही गोष्टी अरुणभाईंमध्ये पाहण्यास मिळत असल्याचे सांगितले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ  बागडे यांनी कर्तृत्ववान, निर्गवी, सालस या शब्दांत अरुणभाईंचे वर्णन केले. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गाणं, शेरोशायरी, साहित्य यांचा संगम म्हणजे अरुणभाई असल्याचे नमूद केले.

अरुणभाईंनी सत्काराच्या उत्तरात आपण मागत नसताना मिळालं आणि ते शरद पवारांनी दिल्याचे नमूद केले. नगराध्यक्ष ते विधानसभाध्यक्ष, विठ्ठल मंदिराचे सभागृह ते इंग्लंडमधील कॉमन हाऊसपर्यंत त्यांनी पोहचविले, असे त्यांनी सांगितले.

सभागृह चालविण्याचा आदर्श दिला : शरद पवार

पालिकेच्या कामकाजाचा तसेच विधानसभाध्यक्ष असताना समतोल राखून सभागृह चालविण्याचा आदर्श अरूणभाईंनी घालून दिला, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी नमूद केले. अरुणभाई सत्तेत असोत वा नसोत, पण समाजकारण करणारा माणूस त्यांचा आदर केल्याशिवाय राहणार नाही, असे पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arun gujarathi devendra fadnavis
First published on: 30-05-2017 at 03:11 IST