मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पहाटे पंढरपुरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सपत्नीक महापूजा केली आहे. या महापुजेनंतर बोलताना मुख्यमंत्र्यांनी पंढरीचा कायापालट करणार असल्याची ग्वाही दिली. त्याबाबत विशेष आराखडा तयार करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापुजेनंतर भावना व्यक्त करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आजचा दिवस हा माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या मंदिरात महापूजा करण्याचा मान मला मिळाला, हे माझं भाग्य समजतो. लाखो वारकरी विठू नामाचा जयघोष करत महाराष्ट्रातील देहू, आळंदी, शेगाव आणि पैठण येथून पायी चालत पंढरीच्या पावनभूमीकडे आले आहेत. दरवर्षी न चुकता हे सगळं होत असतं. पण गेल्या दोन वर्षात करोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही. यावर्षी मोठा उत्साह वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळाला. आज याठिकाणी दहा लाखापेक्षा अधिक वारकरी आले आहेत. त्यांना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी खूप खूप शुभेच्छा देतो.”

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, “राज्यातील शेतकरी, वारकरी, कष्ठकरी, कामकार, शेतमजूर, गुंतवणूकदार, उद्योजक आणि समाजातील प्रत्येक घटकाला हे वर्ष सुखाचं, आनंदाच आणि समृद्धीचं जावो, अशी प्रार्थना मी पांडूरंग चरणी करतो. कोविडचं संकट आता लवकरात लवकर जायला पाहिजे. करोनाची कायमस्वरुपी जाण्याची वेळ आली आहे. पांडुरंगाच्या पुण्याईने ते जाईलं,” असंही मुख्यमंत्री म्हणाले.

“राज्याचा विकास झाला पाहिजे, राज्यातील सर्वसामान्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत, असा प्रयत्न राज्यसरकारचा असेल. यामध्ये कृषी, उद्योग, शैक्षणिक, आरोग्य या सगळ्या क्षेत्रात राज्याला चांगलं यश मिळो, अशी अपेक्षा व्यक्त करतो. उशिरा का होईना; पण पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी जास्त पाऊस पडत आहे. पण तिकडे आपली यंत्रणा काम करत आहे. मुबलक पाऊस पडत असल्याने बळीराजा आता सुखावतोय. यावर्षी चांगला पाऊस पडला तर चांगलं पीक येईल, त्यासाठी शासनही प्रयत्नशील असेल. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, यासाठी सरकार कटीबद्ध आहे,” अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांसोबत महापुजेसाठी ‘या’ शेतकरी दाम्पत्याला मिळाला ‘मानाचा वारकरी’ सन्मान

पंढरपुरच्या विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, देशभरातील विविध मोठ्या देवस्थानाच्या ठिकाणी भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा असतात. चांगले रस्ते, पिण्याचं मुबलक पाणी, शौचालये असतात. त्याच प्रकारच्या सोयी सुविधा पंढरपुरात निर्माण करणार आहे. त्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लाखो भक्त इकडे येत असतात, त्यामुळे यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. लवकरात लवकर डीपीआर तयार झाल्यास शासन त्याना मंजुरी देईन. या ठिकाणाचं पावित्र्य कसं जपता येईल आणि ज्या सोयी-सुविधा द्यायच्या आहेत, त्यामध्ये कुठेही हात आखडता घेणार नाही,” असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashadhi ekadashi 2022 mahapooja cm eknath shinde on pandharpur development speech rmm
First published on: 10-07-2022 at 09:04 IST