सोलापूर : गतवर्षाप्रमाणे यंदाही आषाढी एकादशी आणि मोहरम उत्सव एकत्र येत आहेत. त्यानिमित्ताने मंगलमय आणि भक्तिमय वातावरण दिसत असून धार्मिक आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गेले पाच दिवसांपासून मोहरम उत्सवात विविध पंजे, सवारी, ताबुतांची प्रतिष्ठापना होऊन विशिष्ट दिवशी पंजांच्या मिरवणुका निघत आहेत. यात मुस्लिम धर्मीयांसह हिंदू धर्मीयांचा सहभाग दिसून येत आहे. मानाच्या सवारींना नैवेद्य दाखविण्यासाठी, नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. मीठ गल्लीत पीर थोरले मौला अली स्वारीच्या मंडपात दिवसभर दर्शनासाठी आणि नैवेद्य दाखविण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तर इकडे थोरला मंगळवेढा तालीम भागात पीर बडा मंगलबेडा (अहले हरम) सवारीच्या मशिदीत भाविकांची गर्दी झाली होती. मलिदा, चोंगे, गूळ, रोट, खारीक-खोबरे-लिंबांचे तोरण अर्पण करून दर्शन घेतले जात होते. उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे आदल्या दिवशी मानाच्या सवारी, पंजे यांना पारंपरिक पद्धतीने नैवेद्य अर्पण करण्यासाठी गडबड दिसून आली.
दुसरीकडे आषाढी एकादशी आणि मोहरम उत्सवाचा मिलाफ असल्याचे औचित्य साधून सवारींच्या मिरवणूक मार्गावरील विठ्ठल मंदिरातर्फे सवारीला विठ्ठलाचा आवडता तुळशी हार अर्पण करण्याची तयारी होत आहे. तर त्याबद्दल सवारीकडूनही विठ्ठल मंदिरात तुळशीहार अर्पण केला जाणार आहे. थोरला मंगळवेढा तालीम येथील पीर मंगळवेढेसाहेबांच्या सवारीच्या मिरवणुकीत चौपाड विठ्ठल मंदिरासमोर हा अनोखा सामाजिक आणि धार्मिक मिलाफ पाहायला मिळणार आहे.