अहिल्यानगर : आषाढी वारीसाठी पंढरपुराच्या विठ्ठलाच्या ओढीने निघालेल्या विविध दिंड्या- पालख्यांच्या आगमनाने नगर शहरातील रस्ते गजबजून गेले आहेत. विविध मार्गांनी येणाऱ्या या पालखी-दिंडी सोहळे शहरात येऊन पुढे सोलापूर रस्त्याने पंढरपूरकडे प्रस्थान करतात. त्यामुळे नगरच्या रस्त्यांवर सध्या अहोरात्र विठू नामाचा, ज्ञानोबा-तुकोबाचा गजर ऐकू येत आहे.
खांद्यावर भगवी पताका, टाळ- मृदंगाचा नाद, महिलांनी डोक्यावर घेतलेले तुळशी वृंदावन, भजने म्हणत, फुलांनी सजवलेले रथ अशा भक्तिपूर्ण वातावरणात दिंडी सोहळ्यांचे आगमन होत आहे आणि नगरमध्ये मुक्काम करून पुढे प्रस्थान केले जात आहे. शहरातील अनेक संस्था, संघटना या दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांची वर्षानुवर्षे बडदास्त ठेवत असतात. त्यांच्या मुक्कामाची, राहण्याची, जेवणाची व्यवस्था करतात. कोणत्या देवस्थानची, कोणत्या दिंडीचे कधी आगमन होणार याचे वेळापत्रक आधीच ठरलेले असते. त्यानुसार कार्यकर्ते व्यवस्थेचे नियोजन करत असतात. त्यातून वारकरी, संस्था-संघटनांचे कार्यकर्ते यांचे ऋणानुबंध निर्माण झालेले आहेत.
पैठणची संत एकनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर संत निवृत्तीनाथ महाराज, पिंपळनेरची संत निळोबाराय महाराज, संत ज्ञानेश्वर माउली अशा विविध देवस्थानच्या मानाच्या दिंड्यांसह १६० हून अधिक दिंड्या नगर शहरातून मार्गस्थ होत असतात. यातील बहुसंख्य दिंड्या नगरमध्ये मुक्काम करतात. या दिंड्यातून सुमारे ३ लाखांवर वारकरी सहभागी असतात, असा जिल्हा प्रशासनाचा अंदाज आहे. या दिंड्यांच्या व्यवस्थेसाठी प्रशासनाने पिण्याच्या पाण्याचे टँकर, तंबू, स्वच्छतागृहे, मुक्कामासाठी प्राथमिक शाळांच्या खोल्या आदी सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यासाठी राज्य सरकारने २ कोटी ६१ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिलेल्या आहेत.
शहरातील आगमनानंतर नागरिकांकडून दिंडी-पालख्यांचे सडा समार्जन, रांगोळ्या काढून, फुलांची उधळण करत विविध ठिकाणी स्वागत केले जाते आहे. अनेक ठिकाणी रिंगण सोहळेही रंगतात. मुक्कामामध्ये दिंडी प्रमुखांचे कीर्तन, प्रवचन सोहळे रंगतात. त्यामुळे शहरात भक्तिरसाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विसावा घेतल्याने, ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा त्रास जाणवत नसल्याने वारकऱ्यांचे मार्गक्रमण सुरू आहे. मात्र, काही दिंड्या मध्यवस्तीत जात असल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे.