काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करणे माजी आमदार आशीष देशमुख यांना महागात पडले आहे. त्यांची काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने देशमुख यांना पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निलंबित केले आहे. एकीकडे त्यांच्यवार निलंबनाची कारवाई झालेली असताना दुसरीकडे ते बाजार समितीच्या राजकरणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी काका अनिल देशमुख यांच्याविरोधातच दंड थोपटले आहेत.

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काका-पुतण्यांचे राजकारण पाहायला मिळणार आहे. कारण, काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले आशिष देशमुख यांनी काका अनिल देशमुख यांच्याविरोधात दंड थोटपले आहेत. नरखेड बाजार समितीत राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचं वर्चस्व आहे. त्यामुळे, नरखेड बाजार समितीतील राष्ट्रवादीचे सभापती यांच्याविरोधात आशिष देशमुख यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासंदर्भात उद्या मतदान होणार असून, राष्ट्रवादीचा सभापती नरखेड एपीएमसीमधून गेलेला असेल, अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी दिली. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

हेही वाचा >> आशीष देशमुख यांची काँग्रेसमधून हकालपट्टी; राहुल गांधी, नाना पटोलेंवर टीका करणे भोवले

“राष्ट्रवादीच्या सभापतींविरोधात मोठ्या प्रमाणात संचालक मंडळात नाराजी होती. अविश्वास प्रस्ताव आणण्याकरता १८ पैकी ९ जण लागतात. हा अविश्वास प्रस्ताव पारित होण्याकरता १२ जणांची गरज असते. आमच्या लोकांनी त्यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल केला. तेव्हा १२ जण आमच्याकडे आले. आता, यासंदर्भात उद्या २६ मे रोजी मतदान होईल आणि राष्ट्रवादीचा सभापती नरखेड एपीएमसीमधून गेलेला असेल”, असं आशिष देशमुख म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आशिष देशमुख भाजपाच्या संपर्कात?

आशिष देशमुख हे २०१४ मध्ये भाजपकडून काटोलमधून निवडून आले होते. त्यांनी माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी भाजपला रामराम केला. नंतर त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये फडणवीस यांच्याविरोधात निवडणूकदेखील लढवली. आता ते पुन्हा भाजपशी जवळीक साधून आहेत. फडणवीस यांनी नुकतीच देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट दिली. त्यापूर्वी देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. भाजप त्यांना सावनेर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्याविरोधात मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.