मुंबई पालिकेने करोना काळात लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी टेंडर प्रक्रिया न राबवता तातडीने सोयीसुविधा उभारण्यास आणि वस्तूंची खरेदी करण्यास प्राधान्य दिलं होतं. मात्र, यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सातत्याने भाजपाकडून करण्यात येत होता. या सर्व प्रकरणांची चौकशी कॅगकडून चौकशी करण्यात येणार आहे. यावरून आता मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर घणाघाती आरोप केले आहेत. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“मुंबई पालिकेत दुराचार आणि भ्रष्टाचाराचे पेव माजलं आहे, त्याला थांबवलं पाहिजे, यासाठी आम्ही विधानसभेत प्रश्न मांडले. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॅगद्वारे चौकशीचे विधानसभेत आश्वासन दिलं होतं. त्यानुसार, २८ नोव्हेंबर २०१९ ते २८ फेब्रवारी २०२२ या कालावधीमध्ये १० वेगवेगळ्या विभागात १२ हजार १३ कोटी रुपयांच्या कामांच्या कॅग चौकशीचे मुख्यमंत्री शिंदेंनी आदेश दिले आहेत,” असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
हेही वाचा : “माझ्यासाठी विषय संपला”, रवी राणांकडून दिलगिरी व्यक्त, बच्चू कडूंसंबंधी केलेलं वक्तव्य घेतलं मागे
“मुंबईकर जीव कसा वाचेल, या भितीत होता तेव्हा…”
“करोनाच्या काळात सामान्य मुंबईकर जीव कसा वाचेल, या भितीत होता. तेव्हा कंत्राटदार आणि सत्तेत बसलेली लोक खिसा कसा गरम होईल हे पाहत होते. माजले होते बोके, करोना काळात खाऊन खोके, त्या सर्वांची चौकशी एकदम ओके,” अशी टीका शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
“…याचंही राज ठाकरेंनी अभिनंदन करावे”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेल्यावरून पंतप्रधान मोदी १०० टक्के न्याय देतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावरून आशिष शेलार म्हणाले, “एअर इंडियाची इमारात मुंबईकरांच्या सेवेस देण्याचं काम पंतप्रधान मोदींच्या माध्यमातून झालं आहे. मुंबई ते अहमदाबाद मेट्रो अथवा बुलेट ट्रेनच्या कामांना मंजुरी आणि पैसे केंद्रातून येतात. तसेच, पुण्यातील रांजणागवला इलेक्ट्रॉनिक क्लस्टर उभे राहणार आहे, याचंही राज ठाकरेंनी अभिनंदन करावे,” असा टोला शेलार यांनी लगावला आहे.
“महाराष्ट्र मागे राहिला याचं कारण उद्धव ठाकरे”
राज्यातून प्रकल्प गुजरातला गेले, यावरून आमदार आदित्य ठाकरे सतत सरकारवर टीका करत आहेत. त्यावर “महाराष्ट्राला अडीच वर्षात मागे नेण्याचं काम महाविकास आघाडी सरकारनं केलं. तीनही प्रकल्पांच्या भूमिपूजनाचे फोटो अथवा करसवलतीचा करार सवलत यांनी दाखवावा. एकही प्रकल्प राज्यात आलाच नाहीतर, गेलाच कसा. महाराष्ट्र मागे राहिला याचं कारण उद्धव ठाकरे आहेत. निष्क्रीय सरकार आणि निष्पाप जनता हे चित्र अडीच वर्षात होते. हे चित्र आता बदललं आहे,” अशी टीका शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
कोणत्या प्रकल्पाची चौकशी होणार?
- करोना काळातील खर्च – ३५३८ कोटी
- दहिसर-अजमेरा भूखंड खरेदी – ३३९ कोटी
- मुंबईतील ४ पुलांच बांधकाम – १०९६ कोटी
- ३ कोविड रुग्णांलयातील खर्च – ९०४ कोटी
- मुंबईतील ५६ रस्त्यांची दुरुस्ती – २२८६ कोटी
- सहा सांडपाणी प्रकल्प – १०८४ कोटी
- घनकचरा व्यवस्थापन – १०२० कोटी
- ३ मलनिसरण प्रक्रिया केंद्र – ११८७ कोटी