Andheri East By-Election: भारतीय जनता पार्टीनं अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध होणार असून ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनीही आपल्या पक्षनेतृत्वाचा आदेश मान्य केला आहे. भाजपाच्या या निर्णयानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अनेकांनी भाजपाच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. तर काहींनी भाजपाला उशिरा शहाणपण सुचल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, भाजपा नेते आशिष शेलार यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भाजपानं महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला असून राज्यातील जनतेचं याला समर्थन आहे. भाजपानं घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला उच्च स्तरावर नेण्याच्या मालिकेचा एक भाग असल्याचं विधान आशिष शेलार यांनी केलं आहे. ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते.
यावेळी आशिष शेलार म्हणाले, “भारतीय जनता पार्टीचं नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वरिष्ठांशी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून प्राप्त परिस्थितीत महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला संपूर्ण जनतेचं समर्थन आहे. भाजपानं घेतलेला हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांनी मान्य केला आहे. त्यामुळे यावर वेगळं भाष्य करण्यासारखं काहीही नाही. त्यातील सर्व पैलू आता समोर आले आहेत. भाजपानं घेतलेली भूमिका ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला, प्रथा आणि परंपरेला उच्च स्तरावर नेण्याच्या मालिकेतला एक भाग आहे. स्वत: उमेदवार मुरजी पटेल यांनीदेखील त्याबद्दलची कार्यवाही केली आहे.”
हेही वाचा- Andheri Bypoll: “हे खूप चुकीचं झालंय”, निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांचा आक्रोश
दरम्यान, भाजपाच्या या निर्णयानंतर मुरजी पटेल यांच्या काही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे, याबाबत विचारलं असता आशिष शेलार म्हणाले, “मी समस्त भाजपाच्या मुंबईतल्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, त्यांनी आपली ऊर्जा राखून ठेवावी. दोन महिन्यात येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्या ऊर्जेचा आपण उपयोग नक्की करू. पक्षाचा निर्णय कळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करणं, हे स्वाभाविक आहे. लोकशाहीत भावना व्यक्त करण्याचं स्वातंत्र आहे.”