नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या वडलांचा राजकीय वारसा पुढे नेताना, नांदेडमध्ये काँग्रेसच्या माध्यमातून अनेकांना राजकीयदृष्ट्या मोठे केले. काहींना पात्रतेपेक्षा जास्त मिळाले. चव्हाण आता भाजपामध्ये असून नांदेडसह जिल्हाभरात त्यांच्यासोबत काँग्रेसमधील सहकारी कार्यरत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपामधील जुन्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत मन मोठे ठेवा, अशी अपेक्षा या पक्षाच्या एका माजी पदाधिकार्‍याने व्यक्त केली आहे.

आगामी काळात नांदेड मनपा तसेच नांदेड जि.प. आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असून त्यामध्ये आपल्या अधिकाधिक जुन्या-काँग्रेसी समर्थकांना भाजपाची उमेदवारी मिळावी, याची योजना आणि जुळवाजुळव खा.चव्हाण, त्यांचे सहकारी अमरनाथ राजूरकर यांनी चालवली आहे. पालकमंत्री अतुल सावे यांच्यासह पक्षाचे संघटनमंत्री संजय कौडगे यांच्यावर त्यांचा दाट प्रभाव दिसत असून चव्हाण यांनी भाजपाच्या वरिष्ठांशीही संवाद-संपर्क वाढवला आहे.

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने खा.चव्हाण तीन-चार दिवस दिल्लीमध्ये होते. तेथील वास्तव्यात त्यांनी राजूरकर यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रसादजी यांची सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगाचे छायाचित्र मंगळवारी सायंकाळनंतर समाजमाध्यमांत झळकल्यानंतर शिवप्रसाद यांच्या कार्यालयातील भिंतीवरच्या एका चित्रचौकटीवर (फ्रेम) माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या गाजलेल्या कवितेच्या ओळी कॅमेर्‍यामध्ये टिपल्या गेल्या.त्या कवितेकडे चव्हाण व त्यांच्या सोबत्यांचे लक्ष गेले किंवा कसे, ते कळाले नाही. पण नांदेडस्थित भाजपाच्या एका जुन्या पदाधिकार्‍याने त्या कवितेतील ‘छोटे मनसे कोई बडा नहीं होता, टूटे मनसे कोई खडा नहीं होता…’ या ओळींकडे लक्ष वेधत अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरामध्ये मन मोठे करून भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून स्थानिक पातळीवर नव्या चर्चेला तोंड फोडले.

शिवप्रसाद आणि खा.चव्हाण यांच्या सदिच्छापर भेटीचे छायाचित्र वरील पदाधिकार्‍याने ‘लोकसत्ता’कडे अग्रेषित करण्यापूर्वी नांदेडमध्ये मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये जुने आणि नवे अशी चर्चा सुरू झाली असून चव्हाण यांनी पक्षात आणलेले काँग्रेसचे बहुसंख्य माजी नगरसेवक आपापल्या प्रभागांत उमेदवारीवर दावा सांगण्याच्या तयारीत आहेत. पण पक्षनेतृत्वाने भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांसह नव्या चेहर्‍यांना संधी व वाव दिला पाहिजे, अशी मागणी आता समोर आली आहे.

खा.चव्हाण यांच्यासोबत भाजपात आलेल्यांपैकी काहींनी मनपामध्ये दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले. त्यांत अमित तेहरा, भानुसिंह रावत, विरेन्द्रसिंघ गाडीवाले, किशोर स्वामी आदी नावे आघाडीवर आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसने एका कुटुंबातून दोघांना उमेदवारी बहाल केली होती. तो प्रयोग भाजपामध्ये होऊ नये, असे या पक्षाच्या जुन्या पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

खा.चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशास दीड वर्ष लोटले आहे. आरंभीच्या नव्या पर्वात त्यांनी पक्ष संघटनात्मक बाबींत फार लक्ष घातले नाही; पण गतवर्षी प्रताप पाटील चिखलीकर यांना भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाधीन केल्यानंतर चव्हाण यांनी भाजपा पक्ष संघटनेत लक्ष घातले. महानगर भाजपाच्या अध्यक्षपदी त्यांनी आपला मोहरा आणला तर उत्तर जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर आपला वरचष्मा राखला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारांच्या निवडीत आपल्या समर्थकांना अधिकाधिक वाव देण्याचा चव्हाण यांचा मानस दिसत असल्यामुळे जुन्यांच्या बाबतीत ‘मन मोठे करा’ असा सूर निघाला आहे.