बेळगावसह सीमाभागातील मराठीबहुल ८६५ गावांसाठी महाराष्ट्र सरकारनं आरोग्य विमान योजना राबविण्याची घोषणा केली आहे. पण, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी महाराष्ट्राच्या सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या राज्यात प्रवेश करू नये, असा इशारा दिला आहे. यावरून पुन्हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावर्ती भागाचा मुद्दा तापणार आहे. अशातच माजी मुख्यमंत्री, काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या विधानाचं समर्थन केलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

सीमाभागातील मराठीबहुल गावांतील नागरिकांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याची घोषणा महायुती सरकारने अर्थसंकल्पात केली होती. अलीकडेच याबाबत अध्यादेश जारी करून निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सिद्धरामय्या यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापू शकतं.

सिद्धरामय्या काय म्हणाले?

“आमच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांबरोबर चर्चा केली आहे. तेथील अधिकाऱ्यांनी कर्नाटकात येऊ नये, असे कळविले आहे,” असं सिद्धरामाय्यांनी बुधवारी म्हटलं होतं.

“सीमावर्ती भागातील लोकांकडे दुर्लक्ष”

यावर अशोक चव्हाण म्हणाले, “सरकारनं पहिलं राज्यात लक्ष दिलं पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे कर्नाटकात जाण्यापेक्षा राज्यातील सीमावर्ती भागावर सरकारनं लक्ष दिलं पाहिजे. सीमावर्ती भागातील लोकांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण होऊ शकते. तसेच, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची केलेलं वक्तव्य चुकीचं नाही.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सिद्धरामय्या यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे सीमाभागातील मराठीभाषकांचे लक्ष लागले आहे.