scorecardresearch

धरणाजवळ असलेली आश्रमशाळा शुद्ध पाण्यापासून मात्र वंचित!; मुतखेल शासकीय आश्रमशाळेतील मुलींचे आरोग्य धोक्यात

निम्म्या जिल्ह्याला पाणी पुरविणाऱ्या धरणाच्या काठावर आश्रमशाळा, पण शाळेतील मुलींच्या नशिबी मात्र पिण्यासाठी अशुद्ध पाणी.

अकोले : निम्म्या जिल्ह्याला पाणी पुरविणाऱ्या धरणाच्या काठावर आश्रमशाळा, पण शाळेतील मुलींच्या नशिबी मात्र पिण्यासाठी अशुद्ध पाणी. भंडारदरा जलाशयाच्या काठी वसलेल्या मुतखेल येथील शासकीय आश्रम शाळेची ही सद्य:स्थिती. एका पातेल्यातील कचरा पडलेले अशुद्ध  पाणी मुली पित आहेत. बाहेर असलेल्या टाकीतील पाण्यातही असेच किडे, घाण पडलेली, अ‍ॅक्वा मशीन बंद पडलेले, वीज पंप जळालेला, वसतिगृहाच्या खोल्या, शाळेच्या कार्यालयातही घाण कचरा, मुख्याध्यापकांचा शाळेत पत्ता नाही. मुतखेल येथील या आश्रमशाळेला जिल्हा परिषद, तसेंच आदिवासी विकास प्रकल्प समितीच्या सदस्या सुनीता भांगरे यांनी अचानक भेट दिली तेव्हा त्यांना हे सर्व दिसले.

सुनीता भांगरे या एका कार्यक्रमासाठी मुतखेल येथे आल्या होत्या. तेव्हा त्यांनी या आश्रमशाळेस आवर्जून भेट दिली. मात्र तेथे जे दिसले ते पाहून त्या व्यथित झाल्या. आश्रमशाळेतील ४-५ मुली एका पातेल्यातले पाणी पितांना त्यांना दिसल्या, म्हणून त्यांनी त्यातले पाणी डोकावून पाहिले तर त्यात किडे, घाण, कचरा आढळला. ते पाणी पिण्यायोग्य नव्हते. म्हणून त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता ते पाणी पिण्यासाठी नाही, असेच सांगण्यात आले पण प्रत्यक्षात ते पिण्यासाठी वापरले जात होते. तेथील अ‍ॅक्वा मशीन बंद अवस्थेत खोलीत ठेवलेले होते. पाण्याच्या टाकीतील पाणी पाहिले असता त्यातही किडे, घाण, कचरा पडलेला होता. हा सर्व किळसवाणा प्रकार पाहून त्यांनी अधीक्षकास मुख्याध्यापक कोठे आहे, हे विचारले. तर मुख्याध्यापक रजेचा अर्ज न टाकता गैरहजर असल्याचे दिसले.

याबाबत त्यांनी प्रकल्पाधिकाऱ्यांकडेही तक्रार केली आहे. अकोले तालुक्यातील आश्रमशाळांमधील शिकत असलेल्या मुलामुलींना चांगल्या सुविधांसाठी दरवर्षी कोटय़वधींचा निधी येत असतो. यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी प्रकल्पाधिकाऱ्यांची आहे. असे असताना या काही कोटींच्या निधीचे काय होते? त्याचा योग्य वापर होत नसेल तर आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी काय करतात, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

सुनीता भांगरे यांचा उपोषणाचा इशारा

राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत दरवर्षी सुमारे ५० कोटी रुपयांचा  निधी येतो. पण मुलांना आवश्यक सुविधा मिळत नाहीत. निधी मग काय नावालाच आहे काय? मुलांनी किडे पडलेले,घाण पडलेले पाणी प्यायचे का? असा संतप्त सवाल करीत याला जबाबदार असणाऱ्या अधीक्षक, मुख्याध्यापक ,शिक्षक व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सुनीता भांगरे यांनी केली. कारवाई न झाल्यास उपोषणाला  बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ashram school dam deprived pure water health girls government danger ysh