सांगली : गोपीचंद पडळकर निश्चितपणे मंत्री होतील, पृथ्वीराज देशमुख खासदार, आमदार होतील, आम्हाला राज्यपाल तरी करा, अन्यथा आमची अवस्था वाजंत्र्यासारखी व्हायची, असे आमदार सदाभाऊ खोत म्हणाले.

खानापूर येथे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र मंजूर करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल आणि जत विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल विट्यात आ. पडळकर यांचा सत्कार मंगळवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. यावेळी आ. खोत बोलत होते. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. खोत म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक दिवस गोपीचंद पडळकर यांना नक्की मंत्री करतील असा मला विश्वास आहे. यावेळी उपस्थित असलेल्या देशमुखांना ते म्हणाले, तुम्ही खासदारकीला मैदानात उतरा, आम्ही दोघे तुम्हाला खासदार करतो. गोपीचंद मंत्री व्हा, देशमुख आमदार, खासदार व्हा, मात्र, आम्हाला राज्यपाल करा. नाही तर आमची अवस्था वाजंत्री वाजवणाऱ्यासारखी व्हायची असे म्हणताच सभेत हशा पिकला.

यावेळी ते पुढे म्हणाले, दोस्तीला गोपीचंद चांगला माणूस आहे, पण माणसं ओळखायला जमत नाहीत. आम्ही मात्र, जनावरांची चांगली पारख करतो. एखादा माणूस जवळ आला की मी सावध करतो, मात्र, गोपीचंद पटकन विश्वास ठेवतो. ते राजकारणात चालत नसते. मात्र, गोपीचंद मोकळ्या मनाचा असल्याने विश्वास ठेवतो असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना आ. पडळकर म्हणाले, आ. जयंत पाटील यांचे अजून तळ्यात-मळ्यात सुरू आहे. त्यांना आता गट, पक्ष कुणी विचारेना झाले आहे. त्यांचे कुठे जायचे हेच अजून नक्की होईना, मात्र आपल्या सर्वांच्या विरोधात ताकदीने लढायचे हाच त्यांचा प्राधान्यक्रम आहे. आता यापुढे भाजप शिवाय देशाला आणि सांगलीला पर्याय उरलेला नाही. येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजप ताकदीने लढविणार असून कोणत्याही स्थितीत जिल्हा परिषदेवर भाजपचाच झेंडा रोवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या दुष्काळी भागाचा विकास करण्यास आपण प्राधान्य देणार असून खानापूर-आटपाडीतील मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचण येऊ नये यासाठी आपण शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरला व्हावे यासाठी प्रयत्न केले आणि ते यशस्वीही झाले, असेही आ. पडळकर म्हणाले. दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्राचा श्रेयवाद खानापूर तालुक्यात बळावला आहे. यासाठी स्व. आमदार अनिल बाबर यांनी पाठपुरावा केला होता. तसेच विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनीही विद्यापीठाच्या अधिसभेत याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथे मंजूर होताच आ. बाबर, माजी नगराध्यक्ष पाटील यांच्याबरोबरीने आ. पडळकर यांचाही नागरी सत्कार करून श्रेय घेण्याचा प्रयत्न होत आहे.