धुळ्यात ५ जणांविरुध्द अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप

loksatta, marathi news paper, news paper, news online, marathi news, atrocity act, thawarchand gehlot
(संग्रहित छायाचित्र)

धुळे शहरातील श्रीरामनगर येथे जुन्या वादातून काही तरुणांनी एकाच्या घरावर सशस्त्र हल्ला करत हाणामारी केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अजय उत्तम माळी (वय २२) याने दिलेल्या फिर्यादीवरुन ५ जणांविरुध्द विविध कलमांसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास अजय उत्तम माळी हा घराच्या बाहेर उभा होता. यावेळी मागील भांडणाची कुरापत काढून संदिप रवींद्र पाटील, प्रमोद पाटील, शुभम पाटील, रवींद्र पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील (सर्व रा.श्रीरामनगर) यांनी त्याच्यावर हल्ला केला.  हातात चाकू, गुप्ती, लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेवून जातीवाचक शिवीगाळ करत  मारहाण केली, असा आरोप अजयने केला आहे.

यात फिर्यादी अजय माळी, रवींद्र उत्तम माळी आणि अनुमित विठ्ठल सोनवणे, योगेश विलास भिसे, रविंद्र काशीनाथ जिरे हे ५ जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपधीक्षक हिम्मत जाधव, पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी  घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात शांतता प्रस्थापित केली. याप्रकरणी हल्लेखोरांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Atrocity case file again 5 man in dhule