रत्नागिरी – लांजा तालुक्यातील देवधे येथील एका कात भट्टीवर धाड टाकून ठाणे आणि नवी मुंबई येथील दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई केली आहे. खैराच्या लाकडातून मिळणारा अवैध पैसा अतिरेकी कारवायांसाठी वापरला जात असल्याच्या संशयावरुन ही कारवाई करत या पथकाने दहा ते बारा लाखांच्या खैराच्या लाकडासह ट्रक जप्त केला आहे. तसेच दोघांना ताब्यात घेत मुंबई येथे चौकशीसाठी नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
दहशतवाद विरोधी पथकाने (एटिएस) लांजा तालुक्यातील देवधे येथील कात बॉयलरवर केलेल्या कारवाईमध्ये सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचा अवैधरित्या आणलेले खैराचे लाकूड जप्त करण्यात आले आहे. तसेच बॉयलर चालक व ट्रक चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. खैराच्या लाकडातून मिळणारा अवैध पैसा हा अतिरेकी कारवायांसाठी वापरला जात असल्याचा संशय असल्याने या अटक केलेल्या दोघांना चौकशीसाठी मुंबईत नेण्यात आले आहे. या पथकाच्या कारवाईमुळे लांजा तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.
लांजा देवधे येथे बरमारे नामक व्यक्तीचा कात बॉयलर असून हा कात बॉयलर अनेक दिवसांपासून बंद आहे. याच कात बॉयलरवर मुंबई येथून एक जण ट्रक मधून विनापरवाना खैराच्या लाकडाची वाहतूक करून हे खैर लाकूड देवधेतील बॉयलर वर आणून ठेवले होते. याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला मिळाल्यानंतर मुंबई आणि नवी मुंबईच्या दहशतवाद विरोधी पथकाने या ट्रकचा पाठलाग करत ते देवधे येथे पोहोचेले.
दहशतवाद विरोधी पथकाने या ठिकाणी धाड टाकून केलेल्या कारवाईत बॉयलरच्या जागेमध्ये सुमारे दहा ते बारा लाख रुपये किमतीचे खैराचे लाकूड आढळून आले. हा सर्व मुद्देमाल दहशतवाद विरोधी पथकाने जप्त करत, खैराचे वाहतूक करणारा ट्रक देखील ताब्यात घेतला. दहशतवाद विरोधी पथकाने बरमारे नामक व्यक्ती तसेच ट्रकमालक या दोघांनाही ताब्यात घेत या प्रकरणाच्या अधिक चौकशीसाठी त्यांना मुंबई नेण्यात आले आहे.