औरंगाबादमधील पाणी पुरवठ्याच्या मुद्य्यावरून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दांत निर्देश दिले. “मला कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा झाला पाहिजे. नवीन योजना पूर्ण होईस्तोवर कालावधी लागणार आहे. त्यामुळे सध्याच्या पाणी वितरणात किती आणि कसे पाणी वाढवून मिळेल याकडे विभागीय आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून नागरिकांना योग्य रीतीने पाणी मिळेल हे पहावे.” असे त्यांनी म्हटले.

तसेच, “औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या १६८० कोटी रुपयांची ही योजना गतीने पूर्ण व्हावी म्हणून या योजनेचा कालबध्द रीतीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा. या योजनेला वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नाही, यातील उणिवा प्राधान्याने दूर करून शहरातील नागरिकांना व्यवस्थित पिण्याचे पाणी मिळेल.” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याचबरोबर, “या नव्या पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार संथ गतीने काम करीत असल्याच्या तक्रारी आहेत, ही अतिशय गंभीर बाब असून त्यांनी कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखविल्यास, विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.” असा सूचक इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

८ जून रोजी औरंगाबादमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा –

औरंगाबाद शहराच्या पाणी प्रश्नावरून विरोधी पक्ष भाजपाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वात पाणी प्रश्नावरून भव्य मोर्चा देखील काढण्यात आला होता. औरंगाबाद महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर यावरून जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान ८ जून रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादला सभा होणार आहे. तत्पूर्वी या महत्वाच्या मुद्य्यावरून मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावल्याचे दिसून आले.