रत्नागिरी – केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने रत्नागिरी जिल्ह्यात ७८१ ठिकाणी लवकरच स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘वेदर इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क डेटा सिस्टीम’ या महत्त्वाकांक्षी योजनेत रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश करण्यात आल्याने याचा जास्तीत जास्त फायदा शेतकरी वर्गाला होणार आहे.
‘वेदर इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क डेटा सिस्टीम’ ही महत्त्वाकांक्षी योजना संपुर्ण देशात राबविण्यात येत आहे. याबरोबर महाराष्ट्र राज्यात देखील राज्य सरकारच्या मदतीने ही योजना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवली जात आहे. हवामानदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या रत्नागिरी जिल्ह्यात तब्बल ७८१ ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्रे उभारली जाणार आहेत. ही योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरणार आहे.
या योजनेसाठी सध्या ५५९ ग्रामपंचायतींनी केंद्रांसाठी जागा निश्चित केली असून, ७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये प्रक्रिया सुरू आहे. ही केंद्रे उपग्रह व इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या आधारे माहिती संकलित करून थेट केंद्रीय सर्व्हरला पाठवली जाणार आहे. त्यानंतर तज्ज्ञांच्या विश्लेषणातून हवामानविषयक सूचना एसएमएस, मोबाइल अॅप्स व स्थानिक यंत्रणेद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाणार आहेत.
या योजनेमुळे गावपातळीवरील पाऊस, तापमान, आर्द्रता, वाऱ्याची अचूक नोंद होणार आहे. आपत्ती व नुकसानीची तपशीलवार आकडेवारी मिळणार आहे. तसेच पंचनामे व मदतवाटपाची गती वाढणार आहे. शेतकरी वर्गाला पेरणी, फवारणी, सिंचन व खत व्यवस्थापनासाठी वेळेवर मार्गदर्शन मिळणार आहे. गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी यांची पूर्वसूचना मिळाल्याने पिकांचे संरक्षण शक्य होणार आहे. गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी यांची पूर्वसूचना मिळाल्याने पिकांचे संरक्षण होणार आहे. विमा दाव्यांमध्ये पारदर्शकता वाढून शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे.
राज्यातील पावसाची नोंद तालुक्याच्या महसूल मंडळ पातळीवरच होत होती, त्यामुळे गावागावातील प्रत्यक्ष परिस्थिती समजत नाही. आता प्रत्येक गाव पातळीवर अचूक नोंदी उपलब्ध होणार असून यामुळे जलद मदत – बिनचूक हिशेब या दिशेने रत्नागिरी जिल्हा देशात आदर्श ठरणार आहे.
‘वेदर इन्फॉर्मेशन अँड नेटवर्क डेटा सिस्टीम’ ही महत्त्वाकांक्षी योजनेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विश्वास वाढणार आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम व परिणामकारक होणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे.