राज्यातील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवलेला आहे. तर, १ मे पासून केंद्र सरकारने १ मे पासून देशभरात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली असून १८ ते ४४ वयोगटातल्या नागरिकांना या टप्प्यामध्ये लसीकरण केलं जाणार आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र लसीचा पुरवठा पुरेसा मिळेपर्यंत या वयोगटासाठी व्यापक लसीकरण सुरू करता येणार नाही, अशी भूमिका जाहीर केली होती. तर, आज १ मे पासून राज्यात या वयोगटातल्या नागरिकांना प्राथमिक स्वरूपात मोजक्या केंद्रांवरच लस दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यातील रुग्णालयांमध्ये सध्या ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविरसह लस तुटवडा भासत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनेतेशी संवाद साधताना भाष्य केलं आहे. रेमडेसिविरचा अनावश्यक वापर टाळा, असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ”आता अचनाक रेमडेसिविरची मागणी फार मोठ्याप्रमाणावर सुरू झाली आहे. आपल्याला रोजची सरासरी ५० हजार इंजेक्शनची आवश्यकता आहे. आपण आज किती मिळवत आहोत, तर ऑक्सिजन प्रमाणेच रेमडेसिविरचं वितरण हे केंद्राने आपल्या हातात घेतलेलं आहे. कारण, परिस्थती फारच वाईट आहे. प्रत्येक राज्याला ऑक्सिजन पाहिजे, इंजेक्शन हवेत, व्हेंटिलेटर्स हवे आहेत. आपल्याला साधरणपणे सुरूवातीस केंद्राने दर दिवशी २६ हजार ७०० च्या आसपास हे इंजेक्शन मिळतील अशी व्यवस्था केली होती. आपली मागणी ५० हजारांची आहे. त्यानंतर मी पंतप्रधानांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली. यानंतर ४३ हजार दर दिवशी अशी आपल्यासाठी सोय करण्यात आली. आज साधरणपणे ३५ हजारांच्या आसपास ही रोजची इंजेक्शन आपल्याला मिळत आहेत. त्याचे देखील आपण पैसे देऊन हे इंजेक्शन घेतो आहोत. मात्र ही इंजेक्शन पुरवत असताना, एक गोष्ट मी राज्यातील सर्व कोविड केअर सेंटर व रूग्णालायांमधील कार्यरत डॉक्टर्स आहेत. त्यांना मी सांगतोय, याचबरोबर रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सांगतो आहे की, नीट लक्षात घ्या डब्यूएचओ व आपल्या टास्क फोर्स, केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टरांनी देखील एक सावधानतेचा इशारा दिलेला आहे. तो म्हणजे रेमडेसिविरचा अनावश्यक,अनाठायी वापर करू नका.”
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जनतेशी संवाद – LIVE https://t.co/inljVFPtdA
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 30, 2021
तसेच, गरज नसेल तर रेमडेसिविर वापरू नका. कारण, गरज नसताना दिलं व आवश्यकते पेक्षा जास्त दिलं तर औषधाचे दुष्परिणाम होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही आणि म्हणून मी सर्वांना सांगतो आहे, रेमडेसिविर वापरायचं की नाही हा जो निर्णय आहे हा उपचार करणाऱ्या डॉक्टरांना घेऊ द्या. रेमडेसिविरचा जस जसा पुरवठा होत आहे, तसं आपण तो वितरीत करत आहोत. पण अनावश्यक रेमडेसिविरचा वापर करू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे.असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.
Remdesivir for #COVID19
Remdesivir (EUA) may be considered only in patients with:
Moderate to severe disease
No renal or hepatic dysfunction#Unite2FightCorona #StaySafe pic.twitter.com/3ZXYk1RGrP— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) April 30, 2021
एक रकमी १२ कोटी लशी विकत घ्यायची महाराष्ट्राची तयारी – उद्धव ठाकरे
याचबरोबर, केंद्र सरकारकडे लसींचा पुरवठा वाढवण्याची मागणी देखील मुख्यमंत्र्यांनी केली आहे. “१८ ते ४४ वयोगटातील ६ कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी जे १२ कोटी डोस आपल्याला आवश्यक आहे. हे सर्व १२ कोटी डोस एक रकमी खरेदी करण्याची तयारी महाराष्ट्राची आहे. मी केंद्राला पुन्हा विनंती करतो की आमची पूर्ण तयारी आहे. कृपया आपण यात लक्ष घालून आम्हाला जास्तीत जास्त लसीचा साठा उपलब्ध करून दिला, तर महाराष्ट्र लवकरात लवकर या कोविडच्या संकटावर मात करून दाखवल्याशिवाय राहणार नाही”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.