अलिबाग- अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्ग नेमका कोणाचा हा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. महामार्गाच्या कामात यंत्रणांची टोलवाटोलवी सुरू आहे. महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोन्ही विभाग या रस्त्याची जबाबबदारी झटकत आसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न अलिबागकरांना पडला आहे. सुरवातीला अलिबाग ते वडखळ हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्याला राज्य मार्गाचा दर्जा होता. नंतर मात्र याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला. रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे देण्यात आले. यानंतर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्याचे सर्वेक्षण, प्रकल्प अहवालही तयार करण्यात आला होता. पण रस्त्याच्या किमतीपेक्षा भुंसपादनाची किमंत अधिक असल्याने आणि याच परिसरात अलिबाग विरार बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्प येणार असल्याने या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव बारगळण्यात आला. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याची विनंती केली. त्यानुसार हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाला. मात्र हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग दोघेही या रस्त्यांच्या कामाकडे लक्ष्य द्यायला तयार नाहीत.
आज रस्त्याची अलिबाग शहराच्या वेशीवर महामार्गावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे शहरात येणाऱ्या पर्यटक, वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. खराब रस्त्यामुळे वाहनांचा वेग मंदावर असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते आहे. पण तरीही हे खड्डे भरले जात नाहीत. साट्टीच्या दिवशी या परिसरात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अर्धा तासाचे अंतर पार करण्यासाठी तास ते दिड तास वेळ लागत आहे. रस्त्याच्या दुतर्फा उगवलेली झुडपे काढायची कोणी हा प्रश्नही अनुत्तरीत आहे. महामार्गावर होणारी ही वाहतुक कोंडीची समस्या लक्षात घेऊन या मार्गाचे रुंदीकरण आणि मजबूतीकरण करण्यात यावे अशी मागणी गेल्या पाच वर्षांपासून केली जात आहे. मात्र त्याबाबत ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. महामार्ग विभागाच्या दोन्ही यंत्रणा रस्त्याबाबत टोलटोलवी करत आहेत. त्यामुळे रस्त्याबाबत दाद मागयाची तरी कोणाला हा प्रश्न अनुत्तरीत आहे.
महामार्ग प्राधिकरण हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत केल्याचे सांगते. तर राष्ट्रीय महामार्ग विभाग हा रस्ता आमच्याकडे हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचे सांगतो. सतत पाठपुरावा करूनही महामार्गाच्या दोन्ही यंत्रणा जर रस्ता दुरूस्ती आणि रुंदीकरण करणार नसतील तर दाद परदेशातील यंत्रणांकडे मागायची का?- दिलीप जोग, खड्डे अँक्टीव्हीस्ट
एकदा राजपत्रात नोटीफिकेशन प्रसिध्द झाले की महामार्गाची हस्तांतरण होते. तसे नोटीफिकेशन प्रसिध्द झाले आहे. त्यामुळे अलिबाग वडखळ जबाबदारी आता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचीच आहे. महामार्ग प्राधिकरणाची नाही.-यशवंत घोटकर, कार्यकारी अभियंता
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
महामार्ग आमच्या ताब्यात अद्याप आलेला नाही. हस्तांतरणाची प्रक्रीया पूर्ण होत नाही तोवर आम्ही पुढची कारवाई करू शकत नाही.-
शैलेंद्र गुंड कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग पेण