धाराशिव : ‘त्या’ ११३ जणींपैकी ९० जणी किशोरवयीन आहेत. त्यांना मासिक पाळी येते. मागील चार वर्षांपासून या दिव्यांग मुलींच्या मासिक पाळी कालावधीत अविरतपणे स्वच्छतेची जागृती सुरू आहे. मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन परिषदेकडून मान्यताप्राप्त जागृती फौंडेशनच्या स्वानंदी देशमुख यांची धाराशिवमधील स्वाधार मतिमंद केंद्रातील दिव्यांग मुलींसाठी सुरू असलेली ही तळमळ वाखानण्याजोगीच आहे.

जागृती फौंडेशन ही संस्था मासिक पाळीच्या कालावधीतील स्वच्छतेसंबंधी काम करते. स्त्रीयांमध्ये, किशोरवयीन मुलींमध्ये स्वतःबद्दल, स्वतःच्या शरीराकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल आणि शरीरधर्माबद्दल सकारात्मक भावना निर्माण करण्याची प्रेरणा त्यांच्या कामातून मिळते. धाराशिव येथील तुळजाई प्रतिष्ठान संचलित स्वाधार मतिमंद बालगृहातील मुलींना मागील चार वर्षांपासून स्वानंदी देशमुख सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करीत आहेत. लातूरच्या माहेरवाशीन असलेल्या पुणे स्थित स्वानंदी देशमुख रथ ग्रामीण भागातील मुलींप्रति तळमळ बाळगून आहेत. मुलींसाठी काम करणार्‍या प्रकल्पाच्या शोधात असणार्‍या रथ यांना स्वाआधार मतिमंद मुलींच्या प्रकल्पाची माहिती मिळाली आणि तेंव्हापासून या मुलींसोबत त्यांचा ऋणानुबंध जोडला गेला आहे.

आणखी वाचा-निवडणुकीसंदर्भात मनोज जरांगे यांचं मोठं विधान; म्हणाले, “आपल्याला सत्तेत…”

जगभरात मासिक पाळीच्या काळातील स्वच्छतेसंबंधी आता मोकळेपणाने बोलले जात आहे. त्यामुळे शरीरधर्माच्या बाबतीत सकारात्मक दृष्टिकोन आणि मोकळेपणा यावा याकरिता जगभरात २८ मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीविषयी मनात असलेला गंड दूर व्हावा, सॅनिटरी नॅपकिन वापराची जागरूकता वाढावी, वापरानंतर नॅपकिनची योग्य विल्हेवाट कशी लावावी, अशा अनेक महत्वाच्या बाबींबद्दल दिव्यांग मुलींसोबत जोडून घेवून ही संस्था काम करीत आहे. दिव्यांग असल्या तरी ‘जागृती’च्या सहकार्याने या मुलींमध्येही जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावरही त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. मागील चार वर्षांपासून सुरू असलेला हा अविरत प्रयत्नयज्ञ आजही कायम आहे. त्यामुळे या दिव्यांग मुलींच्यावतीने प्रकल्पाचे संचालक शहाजी चव्हाण, मुख्याध्यापक गुरूनाथ थोडसरे आणि सर्व महिला कर्मचार्‍यांनी जागृती फौंडेशनच्या स्वानंदी देशमुख यांच्या कामाला मनापासून धन्यवाद दिले आहेत.