लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. त्यानंतर काही महिन्यांनी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. असे असताना बीड लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीमध्ये जातीचं राजकारण झाल्याचा आरोप होत आहे. तसेच दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचाही आरोप होतो आहे. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच येणाऱ्या काळात सत्तेत जाण्यासंदर्भात त्यांनी मोठं विधान केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासंदर्भात याआधी अनेकदा सूचक विधानं केली आहेत.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

“बीड जिल्हा संतांची भूमी आहे. आमच्या महाराष्ट्रात आणि बीड जिल्ह्यात असं कधी झालं नाही. आम्ही कधीच म्हणणार नाही की एखाद्या समाजाच्या दुकानात जाऊ नका. असे विचार आम्ही ठेवणार नाहीत. जातीय तेढ निर्माण व्हायला काय झालं? १३ तारखेपर्यंत मतदान होईपर्यंत मराठे चांगले होते. १३ तारीख संपली की मराठे वाईट झाले. निवडणुकीत मराठ्यांनी तुमचं काम केलं नाही का? मराठ्यांनो मी तुम्हाला हात जोडून सांगतो, शांत राहा. आपण फक्त पाहायचं कोण काय करतंय. एक महिनाभर चुका करूद्या, आपण शांत राहा”, असं मनोज जरांगे म्हणाले. मात्र, त्यांच्या या विधानाचा रोख कुणाकडे होता? याबाबत आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

हेही वाचा : “…म्हणून २००४ मध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला नाही”, सुधाकरराव नाईकांचा उल्लेख करत अजितदादांनी सांगितली पवारांची भीती

ते पुढे म्हणाले, “आमचं आंदोलन मोडण्याची कोणाचीही टप्पर नाही. आंदोलन हा संविधानाने दिलेला एक हक्क आहे. काहीजण राजकीय हितापोटी जातीय तेढ निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार असून आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहोत. आम्ही शांत आहोत, आम्हाला शांत राहूद्या. जातीय तेढ निर्माण होऊ नये, असं आवाहन बीड जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांना करतो. त्यांच काम होईपर्यंत ते सगळ्यांच्या पाया पडले. मात्र, शेवटी एक पर्याय आहे. अन्याय बंद करायचा असेल आपल्याला सत्तेत जावं लागणार आहे”, असं मोठं विधान मनोज जरांगे यांनी केलं.

४ जूनच्या उपोषणावर ठाम आहात का?

“ज्यांनी मराठा समाजावर अन्याय केला, त्यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही, पण नाव घेऊन त्यांना पाडल्याशिवाय सोडायचं नाही”, असं म्हणत ४ जूनच्या उपोषणावर आपण शंभर टक्के ठाम आहोत. माझ्या समाजाच्या न्यायाचा विषय असून राज्य सरकारने आम्हाला दिलेल्या शब्दाला आज पाच महिने होऊन गेले आहेत. मग राज्य सरकारला अजून किती दिवस पाहिजेत?”,असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.