प्रभू राम अतुलनीय, पूजनीय पुरुष दैवत होते. आतापर्यंत शिल्पकार, चित्रकार यांनी चुकीच्या पद्धतीने आपल्याला राम दाखवले. निदान अयोध्यामध्ये उभारल्या जाणाऱ्या मंदिरातील मूर्तीमध्ये तरी त्याला मिशा असाव्यात, अशी मागणी मंदिर समितीमधील प्रमुख गोविंदगिरी यांच्याकडे करण्यात आल्याचे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सांगितले. अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्ट रोजी होत आहे, या पार्श्वभूमीवर भिडे गुरुजी यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सोमवारी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तसेच करोनामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, राम मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त देशभर आनंदोत्सव म्हणून साजरा व्हावा. हा सोहळा आनंदाचा, मांगल्याचा आनंदोत्सव म्हणून घरोघरी साजरा व्हावा. प्रत्येक घरात रामाच्या प्रतिमेचे पूजन व्हावे. नागरिकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे एकत्र यावे आणि भूमिपूजन सोहळा उत्साहाने साजरा करावा. कोरोनामध्ये तथ्य नाही. हे मानसिक दुर्बलतेचे लक्षण आहे, असे वक्तव्यही संभाजी भिडे यांनी केले होते.

राम मंदिराचे भूमिपूजन हा गौरवाचा क्षण असल्याचे सांगत भिडे गुरुजी म्हणाले की, गेली पाचशे वर्षे राम मंदिर उभारणीचे प्रयत्न सुरू होते. आता हा प्रयत्न यशस्वी होत असताना राष्ट्रीय सणाप्रमाणे सर्व हिंदूंनी उत्सव साजरा करावा. करोनाचे संकट असले तरी दिवाळी, दसऱ्याप्रमाणे या दिवशी फटाके वाजवून हा सण साजरा केला जावा. प्रत्येक हिंदूने हा दिवस घरासमोर रांगोळी काढून आनंद साजरा करावा असे आवाहनही त्यांनी केले.

महाभारत युध्दावेळी अर्जुनाची जी अवस्था झाली होती, तशीच अवस्था राममंदिर भूमिपूजनावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झाली असल्याचे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी सोमवारी पत्रकार बठकीत सांगितले. ते म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी निमंत्रण नसले तरी अयोध्याला जावे. त्यांना वेगळ्या निमंत्रणाची गरज नाही असे सांगून ते म्हणाले की, राममंदिर उभारणीवरून ठाकरे आणि पवार यांची महाभारत युध्दावेळी अर्जुनाची जी अवस्था झाली होती, तशीच अवस्था झाली आहे. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने पवित्र सोहळ्याला विरोध करणे योग्य नाही. मुख्यमंत्री ठाकरे हे करोना काळात उत्तम कामगिरी पार पाडत असून त्यांनी आता राज्यभर दौरा करून जनतेच्या मनात विश्वास  निर्माण करण्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ayodhya temple lord rama should have a mustache says sambhaji bhide nck
First published on: 04-08-2020 at 07:34 IST