‘आपण भाजपला नाही, तर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे.आम्ही व्यवस्था परिवर्तनासाठी केलेल्या मागण्या भाजप पूर्ण करेल तेव्हा त्यांच्यावर भरवसा ठेवीन,’ अशी स्पष्टोक्ती योगगुरू बाबा रामदेव यांनी केली. आम आदमी पक्षाचा व्यवस्था परिवर्तनावर नाही, तर व्यवस्था तोडण्यावर विश्वास आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
रामदेवबाबा म्हणाले, ‘भ्रष्टाचार सर्वच पक्षांमध्ये आहे, तसा भाजपमध्येही आहे. काँग्रेसचे वरिष्ठ पातळीवरील नेतृत्व भ्रष्ट आहे, मात्र भाजप व्यवस्था स्वच्छ करण्याचे धाडस करू शकते. भाजपचा जाहीरनामा तयार करण्याचे काम नितीन गडकरींकडे असून,माझे सर्व मुद्दे ते जाहीरनाम्यात समाविष्ट करतील. काही कारणामुळे त्यांनी ते केले नाहीत, तर मी पुन्हा जनआंदोलन करेन.’ असेही रामदेवबाबांनी रोखठोकपणे सांगितले.
मोदींमध्ये धडाडी असल्यामुळे त्यांचे नेतृत्व आम्ही स्वीकारले असून, त्यांना मुद्यांवर आधारित पाठिंबा दिला आहे. मोदी हे राष्ट्रवादी व मानवतावादी आहेत. ते मुसलमानविरोधी असल्याचा आरोप राजकीय आहे. मोदी हे पंतप्रधान बनणार आहेत. त्यामुळे मुस्लिमांनी त्यांना शत्रू समजू नये, असे आवाहन रामदेवबाबांनी केले. इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू करून त्यांची मग्रुरी सिद्ध केली. त्या साहसी होत्या, तशा दु:साहसीही होत्या. याउलट मोदी हे साहसी असले तरी विनम्र आहेत, अशा शब्दात त्यांनी मोदींचे कौतुक केले.
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी अण्णा हजारे यांची मदत घ्याल का, असा प्रश्न विचारला असता, अण्णाही देशभर फिरत आहेत. ते बुजुर्ग असून, त्यांना शक्य असेल तेवढे त्यांनी करावे एवढे सांगून रामदेवबाबांनी प्रश्नाचे थेट उत्तर देणे टाळले.
तुम्हाला अपेक्षित असलेले ‘व्यवस्था परिवर्तन’ नेमके कसे आहे, या प्रश्नावर ते म्हणाले की, परिवर्तनाचा अर्थ व्यवस्थेला न्यायोचित बनवणे हा आहे. अध्यात्म व भारतीयता यांचा समावेश असलेले शिक्षण, शेतकऱ्यांना न्याय देणे, कृषी उत्पादनांना भाव मिळवून देण्यासाठी आयोग, राष्ट्रभाषा व प्रांतीय भाषांचा सन्मान, गोहत्येवर बंदी, अर्थव्यवस्थेत क्रांतिकारी बदल घडवणे आणि व्यापक आधार असलेली अर्थव्यवस्था निर्माण करणे आदी गोष्टींचा त्यात समावेश आहे.
सदोष अर्थव्यवस्थेमुळेच देशात १ हजार लाख कोटीचा काळा पैसा निर्माण झाला, असे सांगून रामदेवबाबा म्हणाले, की सध्या चलनात असलेल्या मोठय़ा किमतीच्या नोटा परत घेऊन सर्व आर्थिक व्यवहार बँकांमार्फत करण्यास लोकांना प्रवृत्त केले, तर काळ्या पैशाची समस्या सुटेल. काळे धन संपवण्याची काँग्रेसची इच्छा नव्हती आणि ६७ वर्षे राज्य करणाऱ्या काँग्रेसकडून तशी अपेक्षाही नाही. गेल्या ५ जानेवारीला नवी दिल्लीत केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी काळ्या पैशांची समस्या सोडवण्याचे आश्वासन आणि असा पैसा जमा करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा दिला, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘आम आदमी’ पक्षावर टीका करताना बाबा रामदेव म्हणाले, १४ नोव्हेंबर २०१० रोजी दिल्लीत जंतरमंतरवर १० हजार लोक एकत्र आले आले होते. त्यावेळी माझ्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचाराच्या विरोधात लढण्याचे केजरीवाल यांनी जाहीररित्या म्हटले होते. नंतर मात्र ते आपल्या धोरणांपासून दूर जात आहेत. ‘आप’चा व्यवस्था परिवर्तनावर नाही, तर व्यवस्था तोडण्यावर विश्वास आहे. या पक्षाला दिल्ली विधानसभेत २८ जागा मिळाल्या, त्या काँग्रेसच्या विरोधात लढल्यामुळे. आता त्यांनी आपला झाडू काँग्रेसच्या हाती दिल्याचे फळ त्यांना मिळेल. या पक्षाला आणखी बरेच शिकण्याची गरज असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
आरक्षण धोरणाबाबत मत विचारले असता, आरक्षणाला आमचा विरोध नाही; तथापि जातीवर आधारित आरक्षणाने दुर्बल व गरीब लोक त्याच्या फायद्यापासून वंचित राहिले असल्याने आरक्षणाची प्रक्रिया न्यायपूर्ण होण्याची गरज आहे असे रामदेवबाबा म्हणाले. उच्चवर्गीयांतील गरीब लोकांनाही आरक्षणाचे फायदे मिळण्यासाठी आरक्षण आर्थिक आधारावर दिले जावे अशी मागणी त्यांनी केली.
संग्रहित लेख, दिनांक 8th Feb 2014 रोजी प्रकाशित
‘भाजपला नव्हे, मोदींना पाठिंबा’; रामदेवबाबा यांचा खुलासा
‘आपण भाजपला नाही, तर नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला आहे.आम्ही व्यवस्था परिवर्तनासाठी केलेल्या मागण्या भाजप पूर्ण करेल तेव्हा त्यांच्यावर भरवसा ठेवीन,’
First published on: 08-02-2014 at 02:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba ramadev support to narendra modi not bjp