परभणी : शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून मनाने केव्हाच बाहेर पडलेले आणि अजीत पवारांच्या राष्ट्रवादीत होणारा प्रवेश रखडल्याने अस्वस्थ असलेले माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे सध्या काँग्रेसच्या वाटेवर आहेत. जिल्ह्यातील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांशी त्यांची चर्चा झाली असून यासंदर्भातला निर्णय ते लवकरच घेतील असे काँग्रेसच्या वर्तुळातून सांगण्यात आले. पाथरी विधानसभा हेच कार्यक्षेत्र असलेल्या माजीमंत्री सुरेश वरपुडकर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने त्यांची जागा भरून काढण्यासाठी बाबाजानी यांचा हा संभाव्य काँग्रेस प्रवेश असल्याचे मानले जात आहे.
माजी आमदार बाबाजानी दुर्राणी हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर बराच काळ शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले होते. पुढे त्यांनी अजीत पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि ते या पक्षाचे जिल्हाध्यक्षही झाले. त्यानंतर पुन्हा छत्रपती संभाजीनगरात झालेल्या एका कार्यक्रमात बाबाजानी यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा अजीत पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
मागच्या जून महिन्यात त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीखही ठरली होती. मात्र त्यांच्या या प्रवेशात अडसर निर्माण झाला. त्यामुळे गेल्या काही महिन्यात राजकीयदृष्ट्या ते कमालीचे अस्वस्थ होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून दोर कापलेले आणि अजीत पवारांच्या राष्ट्रवादीतला प्रवेश रखडलेला अशा परिस्थितीत अधिक काळ घालवण्यापेक्षा बाबाजानी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या समर्थकांकडूनही सांगितले जात आहे.
१९८० पासून शरद पवारांसोबत असलेले बाबाजानी त्या वेळच्या एस. काँग्रेसमध्येही होते. चरख्याच्या चिन्हावर त्याकाळी मराठवाड्यात पाथरी, परतुर आणि उस्मानाबाद या तीन नगरपरिषदा निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर परभणीचे पहिले जिल्हाध्यक्ष म्हणून बाबाजानी यांनीच जबाबदारी पार पाडली होती. अगदी अलीकडेपर्यंत ते या पक्षाचे दुसऱ्यांदा जिल्हाध्यक्ष राहिले. पाथरी नगरपालिकेवर त्यांचे गेली अनेक दशके एकहाती वर्चस्व राहिले आहे. पाथरी या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २००४ ते २००९ या काळात प्रतिनिधित्व केले. त्यानंतर दोन वेळा ते विधान परिषदेवर आमदार होते.
२०१२ ते २०१८ या काळात परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून त्यांना आमदारकीची संधी मिळाली आणि दुसऱ्यांदा ते २०१८ साली पुन्हा राष्ट्रवादीच्या कोट्यातून बिनविरोध आमदार झाले होते. अशाप्रकारे बाबाजानी यांना विधिमंडळात तीन वेळा संधी मिळालेली आहे. बाबाजानी यांचा आमदारकीचा कार्यकाळ संपत असतानाच त्यांचे आणखी एक स्थानिक विरोधक राजेश विटेकर यांना पक्षाने विधान परिषदेची संधी दिली त्यामुळेही बाबाजानी गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटात अस्वस्थ होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा पाथरी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली. या निवडणुकीत विटेकर विजयी झाले.
अलीकडेच माजीमंत्री सुरेश वरपुडकर यांनी काँग्रेस मधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या पार्श्वभूमीवर पाथरी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये जाऊन वरपूडकरांची जागा घेण्याचा बाबाजानी यांचा मानस आहे. वरपूडकर भारतीय जनता पक्षात गेल्याने काँग्रेसलाही एका मोठ्या राजकीय चेहऱ्याची गरज आहे. बाबाजानी ती उणीव भरून काढू शकतात. त्या दृष्टीने काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी तर त्यांची चर्चा झालीच पण वरिष्ठ पातळीवरूनही काँग्रेस नेतृत्वाशी त्यांची बोलणी सुरू आहे.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून निराश झालेल्या बाबाजानी यांचा पुढचा राजकीय मुक्काम हा काँग्रेस पक्षातच असेल असे दिसून येत आहे. एवढेच नाही तर वरपूडकर भाजपमध्ये गेल्याने काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे या पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी जर आपणाकडे सोपवली तर सर्व शक्ती पणाला लावून आपण जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवण्याचे काम करू असा विश्वास त्यांनी पक्षाच्या नेत्यांना दिला आहे.