Latest Marathi News रत्नागिरीतील गणपतीपुळे समुद्र किनारी आलेल्या बेबी व्हेल (Baby Whale) माशाचा मृत्यू झाला आहे. या व्हेलला दोन दिवसांमध्ये पाच वेळा वाचवण्याचे प्रयत्न झाले होते. १५ नोव्हेंबरला या माशाला समुद्रात सोडण्यातही यश आलं होतं. मात्र १५ नोव्हेंबरच्याच संध्याकाळी हा बेबी व्हेल पुन्हा किनाऱ्यावर आला आणि त्यावेळी त्याचा मृत्यू झाला. १३ नोव्हेंबरला हा मासा पहिल्यांदा दिसला होता.

गणपतीपुळ्याच्या समुद्रकिनारी आलेल्या व्हेल माशांच्या पिल्लाला पुन्हा समुद्रात सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी येथील निसर्गप्रेमी आणि मत्स्यशास्त्रज्ञांनी केलेले अथक प्रयत्न दुर्दैवाने अयशस्वी ठरले असून बुधवारी संध्याकाळी या पिल्लाचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर वाहून आला आहे.

गणपतीपुळे येथील येथील एमटीडीसी रिसॉर्टच्या बाजूला असलेल्या समुद्राच्या किनारी व्हेल मासा वाळूत असल्याची माहिती गेल्या सोमवारी सकाळी मिळाल्यानंतर निसर्गप्रेमी आणि वन विभागाचा चमू तातडीने तेथे पोहोचला. व्हेल माशाचे सुमारे दोन वर्षे वयाचे पिल्लू समुद्राच्या ओहोटीबरोबर तेथे वाहत आले होते. पण ते जिवंत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला पुन्हा सुखरुप समुद्रात सोडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले.‌ समुद्राला भरती आली असताना स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमार नौकांच्या मदतीने त्याला वाळूतून पुन्हा पाण्यात खेचण्याचे प्रयत्न केले. पण ते यशस्वी न झाल्याने जेसीबीचा वापर करण्यात आला. तरीसुद्धा ते पिल्लू पुन्हा पुन्हा पाण्याच्या बाहेर समुद्रकिनारी असलेल्या वाळूमध्ये येत राहिले. त्यामुळे चांगल्या भरतीची वाट पाहणे आवश्यक झाले. तोपर्यंत पिल्लाला जगवण्यासाठी ओल्या कापडात गुंडाळून वारंवार वारंवार पाणी मारले जात होते. तरीसुद्धा त्याची प्रकृती खालावत असल्याचे दिसून आल्यामुळे पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार सलाईन आणि प्रतिजैविके देण्यात आली. त्यामुळे पिल्लाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे तटरक्षक दलाच्या नौकांच्या मदतीने त्याला पुन्हा भरतीच्या पाण्यामध्ये खेचण्याचा प्रयत्न केला, परंतु सुमारे ३ ते ४ टन वजनाचे ते पिल्लू पाण्यामध्ये खेचण्यात यश आले नाही. अखेर बुधवारी पहाटे भरतीच्या काळात या प्रयत्नांना यश येऊन टगच्या सहाय्याने किनाऱ्यापासून सुमारे ८-९ सागरी मैल अंतरावर खोल समुद्रात ते पिल्लू नेऊन सोडण्यात यश आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देवरुख येथील निसर्ग व पर्यावरणाचे अभ्यासक प्रतीक मोरे यांनी लोकसत्ताला सांगितले की, अशा प्रकारे समुद्र किनाऱ्यावर आलेल्या व्हेल माशाला पुन्हा समुद्रात सुखरुप नेऊन सोडण्याचे प्रयत्न क्वचितच यशस्वी होतात. कारण हा मासा जखमी झाल्याने किंवा अन्य काही कारणाने किनाऱ्यावर आला तर तो जिवंत राहण्याची शक्यता खूप कमी असते. तरीसुद्धा येथील निसर्गप्रेमी, मत्स्य शास्त्रज्ञ, शासकीय यंत्रणा आणि स्थानिक ग्रामस्थांनी केलेले प्रयत्न खरोखर कौतुकास्पद होते. मात्र हा मासा वाचू शकला नाही.