अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. तर त्यांचे पती आमदार रवी राणा अजूनही युवा स्वाभिमान पक्षात आहेत. यावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे. एका घरात दोन पक्षाचे लोक कसे राहू शकतात, हा तर पीएचडीचा विषय आहे, असे ते म्हणाले. अमरावतीत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले बच्चू कडू?

“रवी राणा यांनी त्यांच्या पक्षाच्या नावाप्रमाणे स्वाभिमान टिकवून ठेवला आहे. यासाठी त्यांचे कौतुक करावे लागेल. नवनीत राणा भाजपात गेल्यानंतर रवी राणा यांनी यांच्या घरावर स्वाभिमानाचा झेंडा कायम ठेवला आहे. मग अशा वेळी भाजपाचा झेंडा कुठे लागेल? असा प्रश्न उपस्थित होतो. ही संभ्रम निर्माण करणारी परिस्थिती आहे”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली.

हेही वाचा – राजकारण वाईट! पत्नी काँग्रेसची आमदार, बसपाचा उमेदवार असलेल्या पतीला सोडावं लागलं घर

“सत्ता तिकडे रवी राणा”

“रवी राणा यांनी त्यांच्या घरावर स्वाभिमानचा झेंडा कायम ठेवून एक बाजू मोकळी ठेवली आहे. जर या निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादी पुन्हा सत्तेत आली, ते पुन्हा राष्ट्रवादीबरोबर जातील. जिकडे सत्ता तिकडे रवी राणा, अशी ही रणनीती आहे. याचा विचार आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाने करायला हवा”, असे ते म्हणाले.

“…हा पीएचडीचा विषय”

“महत्त्वाचे म्हणजे एकाच घरात दोन पक्षाचे लोक कसे राहू शकतात, यावर संशोधन करणे आवश्यक आहे. खरं तर हा पीएचडीचा विषय आहे. यासाठी मी आता एका व्यक्तीची नियुक्ती करणार आहे. पत्नी भाजपात आणि पती स्वत:च्या पक्षात असल्यावर ते नेमके कोणत्या पक्षात आहेत, यावर संशोधन झाले पाहिजे”, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला.

“बावनकुळे हे बाहेरचे नेते कसे?”

पुढे बोलताना ते म्हणाले, “बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बोलताना बाहेरच्यांनी नवरा बायकोच्या विषयात बोलू नये, असं नवनीत राणा म्हणाल्या. याचा अर्थ चंद्रशेखर बावनकुळे हे त्यांच्यासाठी आता बाहेरचे नेते झाले आहेत. भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बाहेरचा कसा होऊ शकतो? खरं तर हा ‘गरज सरो वैद्य मरो’ असा प्रकार आहे.”

हेही वाचा – मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्…

“नवनीत राणा यांना तिकीट मिळावी यासाठी बावनकुळे यांनीच प्रयत्न केले होते. आता तिकीट मिळाल्यानंतर त्या बावनकुळे यांना विसरल्या. काही दिवसांनी त्या देवेंद्र फडणवीस यांनादेखील विसरतील. विशेष म्हणजे देशात जर काँग्रेसची सत्ता आली, तर ते मोदी आणि शाह यांनादेखील विसरतील. हा प्रकार आता भाजपाच्या कार्यकर्त्यांना समजून घेण्याची गरज आहे”, असेही बच्चू कडू म्हणाले.