Bacchu Kadu Slams Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. उद्धव ठाकरे हे पुढील १० वर्ष मुख्यमंत्री राहिलेत तरी ते माझ्या ८ महिन्याच्या कामाची बरोबरी करू शकत नाही, असं म्हटलं होतं. राणेंनी साधलेल्या याच निशाण्यावरुन आता अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी कठोर शब्दांमध्ये राणेंना टोला लगावलाय. अकोल्यामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी राणेंवर निशाणा साधला.

शिवसेनेने सुरू केलेल्या शिवसंपर्क अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री ठाकरे यांची सभा शनिवारी वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर झाली. या सभेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपाचे हिंदुत्व, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर त्याचबरोबर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा समाचार घेतला. तसेच केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या विशेष सुरक्षेच्या मुद्द्यावरुनही उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर निशाणा साधला. याच टीकेवरुन सोमवारी नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलंय.

“काही लोकांना संरक्षण देण्याबद्दल ते बोलले. पण चुकीच्या माणसाला दिले आहे का? १९९१ पासून मला सुरक्षा देण्यात आली आहे. उद्धवजी अजून १० वर्षे जरी मुख्यमंत्री असलात तरी नारायण राणेंनी आठ महिन्यात केलेल्या कामाची बरोबरी होऊ शकणार नाही. चेष्टा, विनोद करणे सोपे आहे. हे शिव्या संपर्क भाषण आहे. सभेमध्ये फेरीवाले आणून बसवले होते. त्यांचा शिवसेनेशी संबध काय,” असा सवाल नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केला केला.

याच टीकेवरुन आता बच्चू कडू यांनी राणेंवर निशाणा साधलाय. अकोल्यामध्ये पत्रकारांशी बोलताना, “नारायण राणेंची सर उद्धवजी करुच शकत नाही. कारण त्यांच्या आठ महिन्यांच्या कामाची तपासणी करावी लागेल,” असा टोला बच्चू कडूंनी लागवलाय. पुढे बोलताना, “उद्धवजी हे प्रमाणिक नेतृत्व आहे. अतिशय सात्विक मुख्यमंत्री आपल्याला लाभलेत. त्यामुळे नारायण राणेंची सर मुख्यमंत्री कशी करणार? त्यांची सर हे करुच शकणार नाही. त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे,” असंही ते म्हणालेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यांनी (नारायण राणेंनी) हे सत्य ओकलं. आपण जसं पाहिलं की रेड्याने ज्ञानेश्वरी ओकली, तसं नारायण राणेंनी सत्य ओकलं आहे. मी मुख्यमंत्र्यांची सर करु शकत नाही असा त्याचा अर्थ होतो. तुम्ही करुच नाही शकत,” असा टोलाही बच्चू कडूंनी लागवलाय.