Bachchu Kadu demands Farmers Loan Waiver from Maharashtra GOvernment : पूरग्रस्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ही मागणी घेऊन प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू व इतर शेतकरी संघटनांचं हजारो शेतकऱ्यांबरोबर नागपुरात आंदोलन चालू आहे. हे आंदोलन मागे घ्यावं यासाठी सरकारने शेतकरी नेत्यांना चर्चेचं आमंत्रण दिलं असून बच्चू कडू व शेतकरी नेत्यांचं एक शिष्टमंडळ आज (३० ऑक्टोबर) सरकारमधील प्रमुख नेत्यांशी चर्चा करणार आहे. या बैठकीआधी बच्चू कडू यांनी त्यांच्या मागण्यांचा पुनरुच्चार केला आहे.
बच्चू कडू यांनी काही वेळापूर्वी एबीपी माझाशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, “आज दुपारी आम्ही सरकार बरोबर चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी आमची आंदोलकांची अंतर्गत बैठक होणार आहे. आंदोलनस्थळी आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करू. आम्ही आता आंदोलन स्थिर करत आहोत आमच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर आम्ही सरकारला सामोरे जाऊ त्याचबरोबर आमच्या विखुरलेल्या आंदोलकांनी सुरक्षित स्थळी लावण्याचे काम चालू आहे कारण आता मुसळधार पाऊस सुरू झाला.”
बच्चू कडू म्हणाले, “कोणी कितीही उलटे डाव टाकले तरी…”
माजी आमदार बच्चू कडू म्हणाले, “काही गोष्टी चांगल्यासाठीच घडत असतात, तर काही वाईटासाठी घडतात. कोणी कितीही उलटे डाव टाकले तरी आमचं आंदोलन प्रामाणिक आहे. त्यामुळे आम्हाला निसर्गाने आणि जनतेने देखील साथ दिली. आम्ही रस्त्यावरउतरून आंदोलन करत होतो तेव्हा आम्हाला निसर्गाची साथ मिळाली आणि आम्ही आंदोलनाची जागा सोडली तेव्हा तिथे धो-धो पाऊस सुरू झाला. ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. देवही आमच्या बाजूने आहे असं म्हणावं लागेल. कारण आमचं आंदोलन प्रामाणिक आहे. सरकार कसंही वागलं तरी शेतकऱ्याची गरज महत्त्वाची आहे.”
सरकारने अटी-शर्थींसह मागण्या मान्य केल्या तर काय करणार?
“आमच्या मागण्या आम्ही आज सरकारसमोर मांडणार आहोत. त्यावर तोडगा निघाला नाही तर आम्ही पुन्हा आंदोलनस्थळी येऊ आणि पुढची दिशा जाहीर करू”, असं बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, कडू यांना विचारण्यात आलं की सरकारने कर्जमाफीबद्दल अटी-शर्थींसह निर्णय घेतला तर तुमची भूमिका काय असेल? यावर ते म्हणाले, “जर-तर बद्दल मी बोलणार नाही. आधी आमची व सरकारची बैठक होऊ द्या. त्यानंतर मी यावर बोलतो.”
आमचं आंदोलन यशस्वी : बच्चू कडू
प्रहारचे प्रमुख म्हणाले, “शेतकरी स्वतःच्या खर्चाने या आंदोलनाला आले आहेत. येताना स्वतःचे जेवणाचे डबेही त्यांनी आणले आहेत. हीच खरी चळवळ आहे. हेच आंदोलनाचं महत्त्वाचं यश आहे. सगळेजण एकत्र आले आणि लढले. सगळ्या जातीचे लोक या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनाचं हे यश शेतकऱ्यांचं भविष्य उज्ज्वल करेल.”
